Video: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच...

Tobacco In Plane: तुम्ही आतापर्यंत ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा अगदी एसटी बसमध्ये लोकांना तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 28, 2023, 12:16 PM IST
Video: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच... title=
हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Tobacco In Plane: सोशल मीडियावर मागील काही काळापासून विमानांमधील गोंधळांबद्दलचे व्हिडीओ एकामागून एक व्हायरल होत आहेत. कधी एखाद्या प्रवाशाने विमान हवेत असताना दरवाजा उघडण्याचा केलेला प्रयत्न, कधी प्रवाशांमध्ये झालेली हाणामारी तर कधी इतर काही कारणाने विमानातील व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडीओंमध्ये कधी गंभीर घटना कॅमेरात कैद झालेल्या असतात तर कधी मजेदार घटनाही कॅमेरात कैद होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल यात शंका नाही. हा व्हिडीओ विमानात एक वयस्कर व्यक्ती चक्क तंबाखू खाताना दिसत आहे.

मास्क काढलं अन् तंबाखू तोंडात टाकली

तुम्ही आतापर्यंत बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान लोकांना हातावर तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. अगदी आजूबाजूच्यांना या तंबाखूच्या मळीमुळे शिंका येतील का वगैरे याचाही विचार हे तंबाखूप्रेमी करत नाहीत. तुम्हीही असाच काहीसा प्रकार कधीतरी अनुभवला असेल. मात्र तंबाखू मळण्याचा हा प्रकार विमानात घडला तर? खरोखर असा प्रकार एका विमानात घडला असून हा घटनाक्रम कॅमेरात कैद जाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हायरल व्हिडीओमध्ये भगव्या रंगाचे कपडे परिधान केलेला वयस्कर व्यक्ती सीटवर बसून लपून तंबाखू मळताना दिसत आहे. त्यानंतर ही व्यक्ती चेहऱ्यावरील मास्क खाली करुन तंबाखू तोंडात टाकताना दिसत आहे. 

विमान असो किंवा ट्रेन...

बसल्या जागीच कोणी आपल्याला पाहू नये म्हणून थोडं वाकून तंबाखू मळून ही व्यक्ती तोंडात टाकते आणि अगदी पारावर बसलेल्या एखाद्या वयस्कर व्यक्तीप्रमाणे जोरात हात झटकतो. त्यानंतर ही व्यक्ती चेहऱ्यावर मास्क लावून निवांत बसते. या व्यक्तीच्या रांगेतच एक सीट सोडून बसलेल्या व्यक्तीच्या कॅमेरात हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं व्हिडीओ पाहिल्यास लक्षात येतं. "विमानात असो किंवा ट्रेनमध्ये तंबाखू खाणं फार महत्त्वाचं काम असतं," अशी खोचक ओळ या व्हिडीओवर लिहिलेली आहे. 

आधीही व्हायरल झालेला असा व्हिडीओ पण...

एका दिवसामध्ये 7.7 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जानेवारी महिन्यामध्येही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र तो व्हिडीओ प्रँक व्हिडीओ होता. त्या व्हिडीओमधील व्यक्ती थेट एअरहोस्टेसला तुम्ही विमानाच्या खिडक्या उघडू शकता का मला तंबाखू थुंकायची आहे अशी विचारणा करताना दिसत आहे. तो व्हिडीओ मुद्दाम शूट करण्यात आला होता. मात्र सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ हा तंबाखूची तलफ झालेल्या व्यक्तीचा असून तो अगदी लपून तंबाखू खाताना दिसत आहे.