कोलकाता: लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या धक्क्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांनी नुकतीच एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सामना करण्यासाठी पक्षात दोन नव्या पथकांची स्थापना केली.
'टेलिग्राफ'च्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जय हिंद वाहिनी आणि बंग जननी वाहिनी या दोन नव्या पथकांची स्थापना करण्यात आल्याचे ममतांनी जाहीर केले. यापैकी जय हिंद वाहिनीच्या अध्यक्षपदी आणि संयोजक पदावर ममतांनी आपले बंधू कार्तिक बॅनर्जी व गणेश बॅनर्जी यांची नियुक्ती केली. तर बंग जननी वाहिनी या पथकाचे अध्यक्षपद तृणमूलच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी ममतांनी म्हटले की, गुन्हेगारी आणि समाजकंटक प्रवृत्तीचे लोक भाजपमध्ये गेले आहेत. हे लोक राज्यात अस्थिरता पसरवत आहेत. त्यामुळे अशा लोकांची यादी तयार करण्यात यावी, असा आदेशही ममता यांनी दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव हा स्थायी स्वरुपाचा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे ममतांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसचा गड पाडण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. यामध्ये भाजपला काही प्रमाणात यशही मिळाले होते. २०१४ मध्ये फक्त २ जागा मिळालेल्या भाजपला २०१९ मध्ये ममतांच्या बालेकिल्ल्यात १८ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.