पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणार 'हे' कलाकार

 अभिनेता मनोज बाजपेयी, प्रभू देवा आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यासह इतर ११२ जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. 

Updated: Jan 26, 2019, 08:55 AM IST
पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणार 'हे' कलाकार  title=

नवी दिल्ली : कला, मनोरंजन विश्वातील काही प्रसिद्ध आणि वरिष्ठ व्यक्तिंचा भारत सरकारकडून गौरव करण्यात येणार आहे. अभिनेता मनोज बाजपेयी, प्रभू देवा आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यासह इतर ११२ जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. 

मनोज बाजपेयी आणि मोहनलाल यांची चित्रपटसृष्टीतील एकंदर कारकिर्द पाहता कलाविश्वात या दोन्ही अभिनेत्यांचं योगदान लक्षात येतं. तर, सुपरहिट चित्रपटांच्या संवाद लेखनापासून ते अगदी प्रभावी अभिनयापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या दिवंगत अभिनेते कादर खान यांनाही मरणोपरांन्त सन्मानित केलं जाणार आहे. एका अर्थी हा कलेचाही गौरव आहे, असंच म्हणावं लागेल. 

दिवंगत आसामी कवी आणि संगीतकार, गायक डॉ. भूपेन हजारिका यांना मरणोपरान्त भारत रत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रंगभूमीवर अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अभिनेते- विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर आणि दिग्दर्शक वामन केंद्रे यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर, बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना पद्म विभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

पुरस्कारांचे इतर मानकरी आहेत... 

पद्मविभूषण या मानाच्या किताबाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ‘एल अ‍ॅण्ड टी’ समूहाचे अध्यक्ष अनिल नाईक, पांडवनी शैलीतील पहिल्या लोकगायिका तीजनबाई आणि युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन राहत’ या मोहिमेला बळ देणारे तेथील नेते इस्माईल ओमर गुलेह यांचा गौरव होणार आहे. तर, पद्मभूषण किताबाने १८ जणांचा गौरव केला जाणार आहे. 

पद्म भूषणने सन्मानित केल्या जाणाऱ्यांमध्ये दिवंगत पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर,  माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक बचेंद्री पाल,  ‘एमडीएच’ मसाले उद्योगाचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी, हरयाणात गरीब मुलांच्या शिक्षणासाठी अविरत कार्य करणारे आणि ‘सरस्वती नदी शोध संस्थान’चे संस्थापक दर्शनलाल जैन, रॉकेटमध्ये द्रवरूप इंधनाचे तंत्रज्ञान भारतात आणणारे अंतराळ संशोधक एस. नाम्बी नारायण, साडेतीनशेहून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते मोहनलाल, प्रख्यात सतार आणि सूरबहार वादक बुद्धादित्य मुखर्जी, लातूरमध्ये ‘विवेकानंद हॉस्पिटल’च्या माध्यमातून आरोग्यसेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणारे डॉ. अशोक लक्ष्मणराव कुकडे, देशाचे माजी महालेखापरीक्षक व्ही. के. शुंग्लू, दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे नेते प्रवीण गोरधन तसंच सुखदेव सिंग ढिंढसा, कारिया मुंडा, हुकूमदेव नारायण यादव हे राजकीय नेते तसेच अमेरिकेतील उद्योजक जॉन चेम्बर्स यांचा या यादीत समावेश आहे.