दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात खासदारांना शिळे जेवण दिल्याचा आरोप

महाराष्ट्र सदनाच्या कँटीनमध्ये आमटी किंवा रस्सा तब्बल चार ते पाच दिवस साठवून ठेवला जातो.

Updated: Feb 8, 2020, 03:46 PM IST
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात खासदारांना शिळे जेवण दिल्याचा आरोप title=

नवी दिल्ली: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्र सदनाच्या कँटीनमध्ये शिळे अन्न कशाप्रकारे साठवून ठेवण्यात येते, याचा व्हीडिओच हेमंत पाटील यांनी प्रसिद्ध केला आहे. यासंदर्भात त्यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली. 

हेमंत पाटील यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्र सदनाच्या कँटीनमध्ये आमटी किंवा रस्सा तब्बल चार ते पाच दिवस साठवून ठेवला जातो. इतर खाद्यपदार्थांच्या बाबतीतही असाच प्रकार सुरु आहे. हेच पदार्थ महाराष्ट्र सदनात येणाऱ्या खासदारांना दिले जातात. कंत्राटदाराकडून नियमावलीचे पालन केले जात नाही. आपण याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल केल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. तसेच पाटील यांनी महाराष्ट्र सदन प्रशासनाकडेही या प्रकाराची तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी कँटीन मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार यासंदर्भात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?

काही दिवसांपूर्वीच लोकसभा सचिवालयाकडून दहा खासदारांना महाराष्ट्र सदन सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपच्या खासदार भारती पवार, भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेना खासदार हेमंत पाटील, भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी, ओमराजे निंबाळकर, रणजीत नाईक निंबाळकर यांचा समावेश होता. त्यामुळे हे खासदार नाराज झाले होते.