नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित आहेत. या बैठकीत कमाल समान कार्यक्रमाबाबत निर्णय व्हायची शक्यता आहे. दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गैरभाजप सरकार स्थापन होईल, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. पण शिवसेनेनं जातीय अजेंडा राबवला तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडेल, असं सांगितलं जातंय.
राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला अशी माहिती पुढे आली आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी शिसेनेसोबत जाण्यास संमती दिली, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात १ डिसेंबर आधी शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तसे संकेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत.
भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसेच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध केल्याची माहिती होती. अखेर सोनिया गांधी यांचे मन वळविण्यात शरद पवार यांना यश आल्याचं बोललं जातंय.