यूपीच्या सौरभ त्रिपाठीचं परीक्षा घोटाळा कनेक्शन, लाखो रुपयांच्या वसुलीचा पर्दाफाश

900 बोगस शिक्षकांकडून सौरभनं किती रुपये उकळले? परीक्षा घोटाळ्याचं रेट कार्ड 'झी २४ तास'वर 

Updated: Dec 22, 2021, 10:34 PM IST
यूपीच्या सौरभ त्रिपाठीचं परीक्षा घोटाळा कनेक्शन, लाखो रुपयांच्या वसुलीचा पर्दाफाश title=
संग्रहित छाया

तुषार श्रीवास्तवसह सागर आव्हाड, झी मीडिया : TET घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका बड्या माशाला अटक केली आहे. विनर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचा प्रमुख सौरभ त्रिपाठी असं अट करण्यात आलेल्याचं नाव आहे. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधून सौरभ त्रिपाठी महाराष्ट्रातल्या परीक्षांची सूत्रं हलवायचा. लखनौमधल्या पंचतारांकित हॉटेलमधून पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

कोट्यवधींचा घोटाळा करून सौरभ त्रिपाठी लखनौहून दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण त्याआधीच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. सौरभ त्रिपाठीच्या चौकशीतून जी माहिती समोर आलीय, ती चक्रावून टाकणारी आहे. ज्या 900 बोगस परीक्षार्थींना पास करण्यात आलं, त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली कशी केली जात होती, याचा पर्दाफाश आता झी २४ तासनं केला आहे.

पेपर घोटाळ्याचं रेट कार्ड (हेडर)
TET पास करण्यासाठी प्रत्येकी 45 हजार ते दीड लाख रुपये असा रेट होता. तब्बल 900 बोगस परीक्षार्थींकडून सुमारे 9 कोटी रुपये वसूल करण्यात आले, असं समजतंय. तर म्हाडा भरतीसाठी 15 लाख ते 60 लाख रुपये आणि आरोग्य भरतीसाठी 8 लाख ते 11 लाख रुपये, असा रेट होता, अशी माहिती कळतेय.

कुणाला किती कोटींचा वाटा? 
या घोटाळ्यात प्रत्येकाचा वाटा ठरलेला होता. कुणाला किती रक्कम मिळणार, हे आधीच ठरलेलं होतं. तुकाराम सुपेला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये, दुसरा बडा आरोपी प्रितीश देशमुखला 1 कोटी 25 लाख रुपये, तर अभिषेक सावरीकरला 1 कोटी 25 लाख रुपये मिळतील अशी डील झाली होती, असं समजतंय.

कोट्यवधींची माया जमवली
सौरभ त्रिपाठीचं कनेक्शन पुढं आल्यानंतर या घोटाळ्यातून कंत्राटदार आणि अधिकऱ्यांनी अक्षरश: कोट्यवधींची माया जमवलीच. मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच ही गँग अक्षरशः खेळ करत असल्याचंही पुढं उघड झालं. या महाभागांना संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा का लावू नये, असा सवाल आता उपस्थित होत आहे.