महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी CWCचा ग्रीन सिग्नल ! मुंबईत होणार शिक्कामोर्तब

काँग्रेस पक्षाने ( Congress )महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यासह सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली, त्यात शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात ( Maharashtra)युती करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली.  

Updated: Nov 21, 2019, 12:24 PM IST
महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी CWCचा ग्रीन सिग्नल ! मुंबईत होणार शिक्कामोर्तब title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने ( Congress )महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यासह सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली, त्यात शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात ( Maharashtra)युती करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार सीडब्ल्यूसीने शिवसेनेशी युती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यकारिणी बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "आम्ही राष्ट्रवादीशी झालेल्या आमच्या चर्चेबाबत आम्ही सीडब्ल्यूसीला कळविले आहे."

काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील ताज्या राजकीय परिस्थितीबद्दल सीडब्ल्यूसी सदस्यांना माहिती दिली आहे. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरूच आहे. उद्या मुंबईत निर्णय घेण्यात येईल. त्यादृष्टीने चर्चा सुरु झाली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तासमीकरण, इलेट्रोल बाँड आणि इतर मुद्यांवर चर्चा कऱण्यात आली. काल राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या संयुक्त बैठकीतील माहिती सोनिया गांधींना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांची शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) मुंबईत एक बैठक होणार आहे, तेथे युतीची घोषणा केली जाऊ शकते. बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात पाच तास बैठक झाली. ही बैठक मध्यरात्री संपली. त्यानंतर शिवसेनेबरोबर फोनवर किमान समान कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. त्यावर सहमती झाली आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी गुरुवारी सकाळी काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) आपत्कालीन बैठक बोलविण्यात आली होती. पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान 10 जनपथ येथे ही बैठक झाली. केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, एके अँटनी आणि अन्य काँग्रेस नेते या बैठकीस उपस्थित होते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीशी युती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही बुधवारी सांगितले की, लवकरच महाराष्ट्रात स्थीर सरकार स्थापन होईल, अशी आशा आहे. काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, लवकरच एक चांगली बातमी मिळेल.