सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई

मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 5, 2023, 05:50 PM IST
सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई title=

Bulldozer on Pravesh Shukla House : मध्य प्रदेशमधल्या (Madyapradesh) सूसू कांडाने देशातलं राजकारण तापलं आहे. याप्रकरणातला आरोपी प्रवेश शुक्लाविरोधात (Pravesh Shukla) कठोर कारवाई करण्यात येतेय. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) समोर आल्यानंतर आरोपी प्रवेश शुक्लाला अटक करण्यात आली आणि आज त्याच्या घरावर बुलडोझर (Bulldozer) चालवण्यात आला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपी प्रवेश शुक्लावर रासुका (NSA) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधकांनी याप्रकरणी शिवराज चौहान सरकारावर (Shivraj Chouhan Government) जोरदार टीका केली आहे. 

आरोपीचं संतापजनक कृत्य
मध्यप्रदेशमधल्या सीधी जिल्ह्यातला एक व्हिडिओ समोर आला होता. यात एक तरुण एका आदिवासी मजूरावर लघवी करताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. लघवी करणारा तरुण हा भाजपाशी संबंध असल्याची माहितीही समोर आली. आरोपी तरुणाचं नाव प्रवेश शुक्ला असं असून तो भाजप आमदार केदार शुक्लांच्या जवळचा असल्याचं बोललं जातं. पण आमदार केदार शुक्ला यांनी आपला प्रवेश शुक्लाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत या प्रकरणातून अंग काढून घेतलं. 

पोलिसांनी केली कारवाई
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रवेश शुक्लाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर 294, 506 कलमांशिवाय एससी, एसटी अॅक्ट तसंच रासुका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. 

काय आहे रासुका?
नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका). एखाद्या व्यक्तीमुळे देशातील सुरक्षा आणि सलोखा धोक्यात येणार असेल तर अशा व्यक्तीला रासुकाअंतर्गत ताब्यात घेतलं जातं. 1980 मध्ये सरकारला सुरक्षेच्या दृष्टीने जास्त अधिकार मिळावेत या दृष्टीने हा कायदा करण्यात आला. या कायद्याचा वापर पोलीस आयुक्त किंवा राज्य सरकार करु शकतं. या कायदयाअंतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपीला 3 महिन्यांपर्यंत तुरुंगात ठेवण्याची तरतूद आहे. तसंच गरज वाटल्यास यात वाढही केली जाऊ शकते. पण 12 महिन्यांपेक्षा जास्त दिवस त्याला तुरुंगात ठेवता येत नाही. 

नेमकं काय आहे प्रकरण?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फुटपाथवर बसला आहे. दुसरा एक व्यक्ती त्याच्या अंगावर लघवी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पीडीत व्यक्ती हा आदीवासी जमातीतील मजूर असल्याचे समजते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांनी ट्विट करून शिवराज सरकारवर सडकून टीका केली.