Teacher Election Duty: शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते. काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकार्यांना आढळले. तेव्हा त्यांनी शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते. त्या शिक्षकाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे विचित्र मागण्या केल्या आहेत. या विचित्र मागण्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक अखिलेश कुमार तिवारीला निलंबित केले. अखिलेश हा मदुदरच्या माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक आहे.
शिक्षक अखिलेश कुमार हा अद्याप अविवाहित आहे. तो सतत या विचारात असतो. त्याने कलेक्टरला लिहिलेल्या पत्रातही आपले वैयक्तिक आयुष्य आणि लग्नाचा विषय छेडला. मला 35 लाख रुपये हुंडा घेऊन माझं लग्न लावून द्या आणि फ्लॅटसाठी कर्ज द्या, त्यानंतरच मी कोणतेही सरकारी काम करेल, असे त्याने पत्रात लिहिले.
सतना जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अनुराग वर्मा यांनी उच्च निवडणुकीच्या कामात गैरहजर राहिल्याबद्दल अखिलेशला नोटीस बजावली होती. या नोटीसचे उत्तर देताना एखाद्या मानसिक रुग्णासारखे पत्र त्याने लिहिले.
यावेळी त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल पत्रात उल्लेख केला. माझे संपूर्ण आयुष्य पत्नीशिवाय व्यतीत होत आहे. त्यामुळे रात्री व्यत्यय येत आहेत. आधी माझे लग्न करून द्या. त्यातही मला 35 लाख रुपये रोख हुंडा द्या. याशिवाय रेवा सिंगरौली टॉवर किंवा समदिया येथील फ्लॅटसाठी कर्ज मिळवून द्या, अशी मागणी त्याने पत्रातून केली. प्रथमत: नोकरीत हलगर्जीपणा केल्याचे कबुल करण्याऐवजी त्याने जिल्हाधिकार्यांसमोर अशी विचित्र अट घातली, त्यामुळे जिल्हाधिकारी सतना यांनी त्या शिक्षकाला निलंबित केले.
सरकारी नोकरीत असलेला एक शिक्षक लग्नासाठी हुंड्याची अट ठेवत आहे, हे वाचून मी अवाक झालोय, असे जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले.