Madhya Pradesh: शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

६१ वर्षांच्या शिवराज सिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या काळात सलग तीनवेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते. 

Updated: Mar 23, 2020, 11:07 PM IST
Madhya Pradesh: शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान title=

भोपाळ: भाजपचे उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी रात्री चौथ्यांदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आयोजित करण्यात आलेला हा शपथविधी अवघ्या काही मिनिटांत पार पडला.  राज्यपाल लालजी टंडन यांनी शिवराज सिंह यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज दुपारीच शिवराज सिंह चौहान यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली होती. यानंतर आता त्यांचा शपथविधीही पार पडला आहे. 

६१ वर्षांच्या शिवराज सिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या काळात सलग तीनवेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते. २०१८ मध्ये काही जागांच्या फरकाने भाजपला सत्ता गमवावी लागली होती. या निवडणुकीत भाजपला १०९ तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, अपक्ष, सप आणि बसपाच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवत काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार स्थापन केले होते. 

मात्र, अगदी काठावरच्या बहुमतामुळे अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेस सरकार अस्थिर होते. अखेर १५ महिन्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागला. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटाच्या २२ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यापूर्वीच कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 
त्यामुळे आता सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा भाजपकडे आली आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी शपथविधीनंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आभार मानले. काँग्रेसच्या २२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  दरम्यान, मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर COVID-19 विरुद्धचा लढा ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ट्विटरवरून त्यांचे अभिनंदन केले.