भोपाळ: मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला सोमवारी निर्वाणीचा इशारा दिला. सभागृहात उद्याच विश्वासदर्शक ठराव मांडा. अन्यथा विधानसभेत तुमच्याकडे बहुमत नाही, असे गृहीत धरले जाईल, असे राज्यपालांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपालांची भेट घेऊन १०६ आमदारांची ओळख परेड करवून घेतली. कमलनाथ सरकार अल्पमतात असल्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, असे चौहान यांनी सांगितले.
मध्य प्रदेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, असे सांगितले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी आपल्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
#MadhyaPradesh Governor Lalji Tandon, writes to CM Kamal Nath, stating 'Conduct the floor test on 17th March otherwise it will be considered that you actually don't have the majority in the state assembly.' pic.twitter.com/TvGx4PTr5r
— ANI (@ANI) March 16, 2020
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या २० आमदारांनी राजीनामा दिला होता. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. या सर्व बंडखोर आमदारांना बंगळुरूमधील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांविरोधात काँग्रेस याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईत काँग्रेसला आणखी काही दिवस मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता राज्यपालांनी उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यामुळे आता काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.