'मोदींच्या सभेला यायला कोणीही तयार नाही; दारु, साड्या, पैसे वाटावे लागतील'

मी आतापर्यंत प्रचारासाठी दीड कोटी रुपये खर्च केले आहेत.

Updated: Nov 23, 2018, 10:15 PM IST
'मोदींच्या सभेला यायला कोणीही तयार नाही; दारु, साड्या, पैसे वाटावे लागतील' title=

भोपाळ: सध्या मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये राजकीय पक्षांकडून प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांच्या व्हायरल केल्या जाणाऱ्या ऑडिओ-व्हीडिओ क्लीप सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते कमलनाथ यांची एक वादग्रस्त ऑ़डिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह आणि शिवराज सिंह यांचे निकटवर्तीय मुकेश टंडन यांच्या दूरध्वनी संभाषणाची क्लीप चांगलीच गाजत आहे. मुकेश टंडन हे विदिशा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

मात्र, या सभेसाठी लोक यायलाच तयार नाहीत. त्यामुळे सभेला गर्दी जमवायची असेल तर दारू, साडी आणि पैसे वाटावे लागतील. यासाठी मुकेश टंडन प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांच्याकडे पैशांची मागणी करताना दिसत आहेत. मी आतापर्यंत प्रचारासाठी दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. पक्षाने दिलेला २२ लाख रुपयांचा निधी मोदींच्या सभेसाठी खर्च झाला. आता शेवटच्या दिवशी लोकांना दारु, साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आणखी तीन कोटी रुपये लागतील. अन्यथा आपला पराभव अटळ आहे, असे मुकेश टंडन प्रदेशाध्यक्षांना सांगत आहेत. 

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर टंडन यांनी ही ऑडिओ क्लीप बनावट असल्याचा दावा केला. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, भाजपकडून यावर अधिकृतरित्या कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.