भोपाळ : मध्य प्रदेशात दुपारी १०.३० पर्यंत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. पण अचानक काँग्रेसचा आकडा १०९ वरून ११७ वर जावून पोहोचला आणि भाजपा १०८ वरून ९७ वर गेला, यामुळे त्रिशंकू परिस्थिती संपल्यात जमा आहे. मध्य प्रदेशातही भाजपाला विरोधीपक्षाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. आता काँग्रेसकडे ११८ जागा आहेत, म्हणजेच बहुमताचा आकडा ११५ हा काँग्रेसला निकाल स्पष्ट झाल्यानंतर मिळण्याची शक्यता आहे. भाजपा मात्र ९६ वर अडखळली आहे. तर इतर अपक्ष आमदारांची संख्या १६ वर आली आहे, यात बसपाच्या आमदारांचाही समावेश आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईल हा अंदाज कुणालाही बांधता आलेला नाही. मात्र मध्य प्रदेशचा निकाल हा सर्वांसाठी धक्कादायक आहे. भाजपासाठी देखील ही चिंतेची बाबच म्हणावी लागेल. छत्तीसगडमध्ये देखील जनतेने काँग्रेसच्या बाजूने कल दिला आहे.
काँग्रेसच्या या विजयामुळे भाजपाला आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यावर भर देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला या विजयामुळे मोठा आत्मविश्वास मिळणार आहे. भाजपा कार्यालयासमोर विजयानंतर गर्दी होत होती, तशीच गर्दी आता काँग्रेस कार्यालयासमोर होत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय समीकरणात ही सर्वात मोठी महत्वाची घटना आहे.