JCB Bulldozer Mixer For Food: एखाद्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने काम सुरु असलं की बघ्यांची गर्दी जमते. मध्यंतरीच्या काळात जेसीबी ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु होता. आता पुन्हा एकदा जेसीबीने आपलं लक्ष वेधून घेतलं आहे. जेसीबीच्या (JCB) मदतीने जेवण बनवलं जात आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत जेसीबीच्या मदतीने जेवण बनवताना दिसत आहे. दंदरौआ धाममधील भाविकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. या दिवसात सियपिय मिलन समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहात बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री (Maharaj Pandit Dhirendra Shastri) उपस्थित राहून कथा सांगतात. या कार्यक्रमानिमित्त लाखो भाविक हजेरी लावतात.
मीडिया रिपोर्टनुसार, भंडारा तयार करण्यासाठी 700 आचारी आणि जवळपास 10 हजार स्वयंसेवक मेहनत घेतात. आचारी रात्रंदिवस या भंडाऱ्यासाठी मेहनत घेत असतात. जेवण तयार करण्यासाठी जेसीबी, बुलडोजर आणि काँक्रिट मिक्सरचा वापर केला जातो. भंडाऱ्यात सकाळी 20 क्विंटल पोहे आणि शिरा तयार केला जातो. दुपारी भंडाऱ्यात भाजी, पुरी आणि मालपोहा तयार केला जातो. भंडाऱ्यासाठी गंगा आणि यमुना नावाच्या दोन मोठ्या कढई वापरल्या जातात. त्यात एकावेळी 20 क्विंटल बटाट्याची भाजी तयार केली जाते. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने ट्रॉलीत टाकली जाते.
बातमी वाचा- Knowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण
सोशल मीडियावर दंदरौआ धाममधील भंडाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न तयार करणं सोपं काम नाही. या भंडाऱ्यातील जेवणाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.