'तुम्ही तर माझ्या आईवरही टीका केलीत'; मोदींचा विरोधकांवर पलटवार

काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला आव्हान दिल्यामुळे माझ्यावर टीका

Updated: May 8, 2019, 07:26 PM IST
'तुम्ही तर माझ्या आईवरही टीका केलीत'; मोदींचा विरोधकांवर पलटवार title=

कुरुक्षेत्र: प्रचारादरम्यान खालच्या भाषेत टीका करत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांनी आपल्याला कशाप्रकारे हिणवले होते, याचा सविस्तर तपशीलच सादर केला. माझ्यावर टीका करताना या लोकांनी कित्येकदा पातळी सोडली होती. त्यांनी माझ्यासाठी वापरलेल्या 'लव्ह डिक्शनरीकडे' पाहिल्यास त्याची कल्पना येईल. काँग्रेसच्या नेत्यांनी तर माझ्या आईलाही सोडले नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने मला 'गंदी नाली का कीडा' म्हटले होते. तर काही जणांनी पिसाळलेला कुत्रा,  रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणत मला शिव्या दिल्या. एवढेच नव्हे त्यांनी माझे वडील कोण आहेत?, असा प्रश्न विचारून माझ्या आत्मसन्मानालाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे सगळे मी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर घडले. मी काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला आव्हान दिल्यामुळेच त्यांनी माझ्यावर अशाप्रकारे टीका केल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या एका प्रचारसभेत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख भ्रष्टाचारी असा केला होता. यावरून राहुल गांधी यांनी मोदींनी माझ्या वडिलांचा अपमान केल्याचे म्हटले होते. मात्र, माझ्या मनात मोदींसाठी प्रेम आहे, असेही राहुल यांनी सांगितले. याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. या टीकेला मोदींनी आजच्या भाषणातून प्रत्युत्तर दिले. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने भूतकाळात त्यांच्यावर केलेल्या टीकेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

बालाकोट एअर स्ट्राईकच्यावेळी भारताचा एक वैमानिक पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. पाकिस्तानने त्याला ४८ तासांमध्ये सोडून दिले. मात्र, तेव्हाही काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्यावर कुरघोडी करण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली, अशी टीका यावेळी मोदींनी केली.