सिरोही : राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील रेवददारचे नवनिर्वाचित सरपंच अजबाराम चौधरी यांनी पदभार स्वीकारताच सर्वांना चकित केले आहे. गुरूवारी त्यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पण यावेळी ते स्वत: सरपंचाच्या खूर्चीवर न बसता त्यांनी देवाचा फोटो खूर्चीत ठेवून त्यांची पूजा केली आहे. काळभैरवांच्या फोटोची स्थापना त्यांनी खूर्चीत केली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा होत आहे.
याचदरम्यान, पुढील पाच वर्ष अजबाराम चौधरी जमीनीवर बसून पंचायतीचे कामकाज हाताळणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर काही लोकांनी यावर आक्षेप घेत ही अंधश्रद्धा असल्याचे सांगितले आहे. तर त्यांनी लोकांच्या लक्षात राहण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शिवाय अजबाराम चौधरी यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना सांगितले की, 'कोणत्याही कारणास्तव मला पंचायतीत येण्यास शक्य झालं नाही तर सकाळ-संध्याकाल काळभैरव यांची पूजा नियमित झाली पाहिजे.'
अनेक कामासाठी सामान्य जनता पंचायतीत येते, तेव्हा ते खूर्चीत बसण्यासाठी संकोच व्यक्त करतात. शिवाय वृद्ध व्यक्ती देखील उभेच राहतात. म्हणून सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीच खुर्चीत विराजमान हेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.