मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सगळेच पक्ष कामाला लागले होते. अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी अजुनही कोणत्याच नेत्याची घोषणा केलेली नाही. काँग्रेसमध्ये मात्र राहुल गांधी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जात आहे. राहुल गांधी हे अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवतात. हा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. पण मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यामुळे या मतदारसंघातून राहुल गांधी यांना निवडणूक लढवण्याची भीती वाटते आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
२३ मार्चला केरळचे काँग्रेस अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राहुल गांधी हे अमेठी ऐवजी वायनाड मधून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु झाली आहे. केरळच नाही तर या शिवाय राहुल गांधी हे मध्य प्रदेश, कर्नाटक किंवा तमिळनाडुमधून देखील निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. पण राहुल गांधी हे अमेठीमधून निवडणूक लढवण्यासाठी तयार नाहीत का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. अमेठीमधून विजयाचा विश्वास नसल्याने ते दुसऱ्या जागेवरुन निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत का?
राहुल गांधी हे २००४ पासून अमेठीमधून खासदार आहेत. २००४ आणि २००९ मध्ये राहुल गांधी यांचा मोठा मताधिक्यांनं विजय झाला होता. पण २०१४ मध्य़े मात्र त्यांना मोठा धक्का बसला होता. स्मृती इराणी यांनी येथे आपला जनसंपर्क वाढवला आहे. २०१४ च्या पराभवानंतर ही त्या अमेठीचा दौरा करत होत्या. त्यामुळे त्यांना येथे विजयाचा विश्वास आहे.
राहुल गांधी यांना ४,०८,६५१ मतं मिळाली होती तर स्मृती इराणी यांना ३,००,७४८ मतं मिळाली होती.
राहुल गांधी यांना ४६.२ टक्के मतं मिळाली होती तर स्मृती इराणींना ३४.३८ टक्के मतं मिळाली होती.
मागील ५ वर्षात स्मृती इराणी यांनी अमेठीत लागोपाठ दौरे केले आहेत. राज्यात देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे त्यांना येथे मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे राहुल गांधी यांना विजयाबाबत शंका असल्याची देखील चर्चा आहे.
वर्ष खासदार पक्ष
१९७७ आर.पी सिंह जनता पक्ष
१९८० संजय गांधी काँग्रेस
१९८१ राजीव गांधी काँग्रेस
१९८४ राजीव गांधी काँग्रेस
१९८९ राजीव गांधी काँग्रेस
१९९१ राजीव गांधी काँग्रेस
१९९१ सतीश शर्मा कॉंग्रेस
१९९६ सतीश शर्मा कॉंग्रेस
१९९८ संजय सिंह भाजप
१९९९ सोनिया गांधी काँग्रेस
२००४ राहुल गांधी काँग्रेस
२००९ राहुल गांधी काँग्रेस
२०१४ राहुल गांधी काँग्रेस
अमेठीमध्ये सपा-बसपाने आपला उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहेत. तरी सुद्धा राहुल गांधी यांना येथून विजयाबाबत शंका आहे.
गांधी घराण्याला याआधीही पराभवाचा धक्का बसला आहे. १९७७ मध्ये रायबरेलीमधून इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे नंतर त्यांनी १९७८ मध्ये चिकमंगलुरू येथून पोटनिवडणूक लढवली होती. सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये बेल्लारी येथून निवडणूक लढवली होती.
राहुल गांधी यांनी केरळमधल्या वायनाड मतदारसंघाची निवड का केली असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे. विश्लेषकांच्या मते य़ेथे मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकं जास्त आहेत. त्यामुळे त्यांना येथून निवडणूक लढवणं सोपं जावू शकतं.
२०१४ मध्ये येथे काँग्रेसचे शानवास यांना ३,७७,०३५ मतं मिळाली होती. त्यांना जवळपास ३०.१८ टक्के मतं मिळाली. तर येथील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला सीपीआयच्या सथ्यन यांना ३,५६,१६५ मतं म्हणजे २८.५१ टक्के मतं मिळाली होती.
२००९ मध्ये येथे काँग्रेसच्या शानवास यांना ४,१०,७०३ मतं मिळाली होती. म्हणजेच ४९.८६ टक्के मतं. तर सीपीआयच्या रहमतुल्लम यांना २५,७२,२६४ मतं मिळाली होती. म्हणजेच ३१.२३ टक्के मतं.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अमेठीमध्ये सध्या वातावरण बदललं आहे. हा बदल नेमका कसा आहे हे भविष्यातच कळेल. अमेठीमध्ये जर राहुल गांधी यांचा पराभव झाला तर तो पक्षासाठी देखील मोठा धक्का असेल. त्यामुळे काँग्रेस हा धोका पत्करायला तयार नसेल. त्यामुले राहुल गांधी हे २ मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी देखील शक्यता आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लखनऊ आणि वडोदरा या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. त्यामुळे राहुल गांधी हे देखील २ जागेवरुन निवडणूक लढवतील. पण दोघांमध्ये एक फरक होता की पंतप्रधान मोदींनी पहिल्यांना लोकसभा निवडणूक लढवली होती तर राहुल गांधी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती.
राहुल गांधी यांना अमेठीमधून निवडणूक लढवण्याची खरच भीती वाटते का याचं उत्तर स्वतः राहुल गांधी हेत देऊ शकतील. किंवा २३ मेला याचं उत्तर मिळेलच...