नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यन त्या भाजपच्या भूमिकांवर तोफ डागताना दिसत आहेत. याच दौऱ्यादरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा 'नमो अगेन' आणि 'चौकीदार' असं छापलेल्या टी शर्टची विक्री होण्यावर टीका केली आहे.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजच्या प्रचारांसाठीच्या विविधांगी मार्गांपैकी एक असणाऱ्या या टी शर्टची विक्री करण्यापेक्षा पक्षाने गरजूंना मदत करावी, अशी मागणी केली. गांधी यांनी याविषयीचं एक ट्विटही केलं. 'भाजप नेते टी शर्टची विक्री करण्यात व्यग्र आहेत. त्याऐवजी त्यांनी गरजूंची मदत करावी', असा टोला लगावत गांधी यांनी उत्तर प्रदेशातील शिक्षा मित्रांच्या परिश्रमांची दररोज अवहेलना होत असल्याचा मुद्दा अधोरखित केला. अंगणवाडी सेविका, शिक्षा मित्र, शिक्षक, परिचारिका या दुर्लक्षित घटकांच्या समस्यांकडे गांधी यांनी लक्ष वेधत उत्तर प्रदेशातील भाजपच्या कामांचा समाचार घेतला. समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून हेच मुद्दे उचलून धरल्याचं पाहायला मिळालं होतं.
उत्तर प्रदेश के शिक्षामित्रों की मेहनत का रोज़ अपमान होता है, सैकड़ों पीड़ितों नें आत्महत्या कर डाली। जो सड़कों पर उतरे सरकार ने उनपर लाठियाँ चलाई, रासुका दर्ज किया। भाजपा के नेता टीशर्टों की मार्केट्टिंग में व्यस्त हैं, काश वे अपना ध्यान दर्दमंदों की ओर भी डालते। #Sanchibaat pic.twitter.com/eBeyNSt3va
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 25, 2019
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी विविध मार्गांनी पक्षाचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मग ती घोषवाक्य असोत किंवा एखादा उपक्रम असो. भाजप या साऱ्यात आघाडीवर दिसत आहे. मै भी चौकीदार हूँ असं म्हणत निवडणुकांच्या प्रचारात हातभार लावण्यासोबतत भाजपकडून नमो अगेन आणि चौकीदार असं लिहिलेले टी शर्ट आणि इतर काही गोष्टींची विक्री करण्यात येत आहे. ट्विटर हँडलवरही या वस्तूंची चर्चा पाहायला मिळत आहे. पण, प्रियंका गांधी आणि भाजप विरोधी पक्षांना मात्र त्यांचं हे तंत्र काही पटलेलं दिसत नाही हेच आता स्पष्ट होत आहे.