मुंबई - लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार का हा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. एकीकडे शिवसेनेकडून युतीच्या मुद्द्यावर कोणताही विधाने करण्यात येत नाहीत. तर भाजपकडून सातत्याने युती संदर्भात सकारात्मक विधाने केली जात आहेत. भाजपतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेशी युतीसंदर्भात सकारात्मक बोलणी सुरू असून, नवा फॉर्म्युला शिवसेनेपुढे ठेवण्यात आला आहे. यामध्ये गेल्यावेळेपेक्षा शिवसेनेला एक जागा वाढवून देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. ही जागा कोणती असेल, याबाबत माहिती मिळालेली नाही.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने २६ जागा लढविल्या होत्या. तर शिवसेनेने राज्यातील २२ जागा लढविल्या होत्या. पण यावेळी शिवसेनेला गेल्यावेळेपेक्षा एक जागा जास्त देण्याची तयारी भाजपने केली आहे. म्हणजेच युती झाल्यास भाजप २५ जागांवर उमेदवार उभे करेल तर शिवसेना २३ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांची या प्रमाणे वाटणी करण्यात येईल. दरम्यान, या फॉर्म्युल्याबद्दल शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. शिवसेनेने याला दुजोराही दिलेला नाही. त्यामुळे अद्याप शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांमधील युतीचा विषय अनिर्णित आहे, असेच म्हणावे लागेल.
शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसते आहे. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केलेल्या टीकेला भाजपकडून थेट प्रत्युत्तर देण्यात येत नाही. त्याचबरोबर युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे भाजपकडून सातत्याने सांगण्यात येते आहे. पण शिवसेनेकडून त्याला दुजोरा मिळत नाही. आता नवा फॉर्म्युलाचा मुद्दाही भाजपकडूनच पुढे आणण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही युतीसाठी दबाव वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपशी युती व्हावी, यासाठी शिवसेनेचे खासदार आग्रही आहेत. युती झाली नाही तर मतांची विभागणी होईल आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल. त्यामुळे भाजपशी युती करावी, यासाठी शिवसेनेचे खासदार आग्रही आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक बोलावली आहे.