मुंबई : बॉलीवुडचा दंबग सलमान खान राजकारणात येणार अशी गेले काही दिवस चर्चा सुरू होती. पण आज होळी दिवशी सलमान खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. सलमान खानने ट्वीट करून ही माहिती दिली. या ट्विटच्या बरोबर आधी पंतप्रधान मोदी यांचे ट्विट रिट्वीट करत त्याने आपल्या फॅन्सना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. इंदौरमधून सलमान खान उमेदवार असेल अशा चर्चा रंगल्या होत्या.
सलमान खानचा जन्म इंदौर इथला आहे. त्याचे लहानपणही येथेच गेले आहे. सलमान इंदौर येत जात असतो. त्याला या शहरावर प्रेम देखील आहे. भलेही काँग्रेसमध्ये सलमान जाणार असल्याच्या चर्चा होत असल्या तरीही तो पंतप्रधान मोदींच्या जवळचा मानला जातो. मोदी जेव्हा गुजरातचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी सलमान सोबत पतंग उडवली होती. त्यावेळ सगळीकडे चर्चा रंगली होती. त्यानंतर सलमान खान आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल यांच्या भेटीनंतरही चर्चा सुरू झाल्या. पण या दोघांची मिटींग नेमकी कोणत्या मुद्द्यावर होती हे काही समजले नाही.
Contrary to the rumours I am not contesting elections nor campaigning for any political party..
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2019
सलमान खानला मध्य प्रदेशातून कॉंग्रेस पक्षातर्फे त्याला लोकसभा निवडणुकीची तिकिट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. भोपाळचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याचे संकेत दिले होते. सलमान एप्रिलमध्ये 18 दिवस मध्य प्रदेशमध्ये राहणार आहे. मध्य प्रदेशमध्ये सलमानने योगदान देण्याची आम्ही त्याला विनंती केल्याचे ते म्हणाले. संस्कृती आणि पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यासोबत बोलणी झाल्याचे ते म्हणाले.