‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती

Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 6, 2024, 02:15 PM IST
‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती title=
दोन पक्षांच्या जोरावर भाजपाला स्थापन करावं लागणार सरकार

Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: भारतीय जनता पार्टीला लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये 240 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. 272 चा बहुमताचा आकडा गाठण्यापासून भाजपा 32 जागा दूर आहे. त्यामुळेच आता भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन  करण्यासाठी तेलगु देसम पार्टीचे नेते चंद्रबाबू नायडू तसेच जनता दल युनायटेडचे नेते त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. टीडीपीकडे 16 जागा असून जेडीयूकडे 12 जागा असल्याने भाजपाला या दोघांच्या मदतीने 28 जागा भरुन काढता येणार आहेत. मात्र आता भाजपाला केंद्रात सत्तेत येण्यासाठी पाठिंबा देणाच्या मोबदल्यात या पक्षांकडून मोठ्या मागण्या केल्या जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जेडीयूला काय काय हवंय?

8 जून रोजी राष्ट्रपती भवनामध्ये शपथग्रहण सोहळ्याआधी जनता दल युनायटेडने भाजपासमोर पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्याची माहिती समोर येत आहे. पाठिंब्याच्या मोबदल्यात नितीश कुमारांना 3 मलाईदार खाती हवी असल्याचं समजतं. यामध्ये रेल्वे, अर्थ आणि कृषी मंत्रालय जेडीयूला द्यावं असं नितीश कुमार यांचं म्हणणं असल्याचं समजतं. तसेच एनडीएच्या यंदाच्या मंत्रीमंडळामध्ये तब्बल 80 मंत्री असू शकतात अशी शक्यताही जेडीयूने व्यक्त केली आहे. दर चार खासदारांमागे 1 मंत्रीपद या सुत्रानुसार जेडीयूनेही 3 मंत्रीपदांची मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 5 खासदारांच्या मोबदल्यात 2 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दलित चेहरा म्हणून जीतन राम मांझी यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 

टीडीपीच्या मोठ्या मागण्या

टीडीपीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एनडीकडे 5-6 कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदांची मागणी केली आहे. त्याचबरोबर टीडीपीकडून लोकसभा अध्यक्ष पदाचीही मागणी केली जाणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय, ग्राम विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार, शेती, जलशक्ती, माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन, शिक्षण मंत्रालयाबरोबरच अर्थमंत्रालयातील राज्यमंत्रीपदही टीडीपीला हवं असल्याची मागणी एनडीएच्या घटकपक्षांकडे करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी बुधवारी दिलेली.

नक्की वाचा >> मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण...; राऊतांचा हल्लाबोल

बैठकीला अनेक नेत्यांची हजेरी

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांनी बुधवारी नरेंद्र मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवड केली आहे. संसदीय गटाचे नेते म्हणून मोदींची निवड केलेल्या बैठकीला जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. बुधवारी 16 वेगवेगळ्या पक्षांचे 21 नेते बुधवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एलजीपीचे चिराग पासवान, जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी, जन सेनेचे पवन कल्याण, एजीपीचे अतुल बोरा आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.