'भाजपा म्हणते 'नमो टीव्ही' आमचा पण पंतप्रधान मोदी याबद्दल अनभिज्ञ'

 नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाने गदा आणली आहे.

Updated: Apr 12, 2019, 10:37 AM IST
'भाजपा म्हणते 'नमो टीव्ही' आमचा पण पंतप्रधान मोदी याबद्दल अनभिज्ञ'  title=

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा, योजनांची माहिती देणाऱ्या नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाने गदा आणली आहे.  निवडणुकांदरम्यमान ही वाहिनी प्रदर्शित न करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलने नमो टीव्हीची जबाबदारी स्वीकारली आहे. पण पंतप्रधानांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमो टीव्ही चॅनल पाहिलेच नसल्याचा दावा केला होता. 

काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नमो टीव्ही या वाहिनीवर सर्वतोपरी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी निगडीत कार्यक्रमांचे प्रसारण केले जायचे. पंतप्रधानांच्या सर्व भाषणांत्या आणि प्रचारसभांच्या थेट प्रक्षेपणापासून त्यांच्या सरकारमध्ये उदयास आलेल्या अनेक जनहित योजनांच्या जाहिरातींपर्यंत प्रत्येक गोष्टीचं प्रसारण या वाहिनीवरुन केले जात होते. इतकेच नव्हे तर, पंतप्रधानांच्या कार्याची ग्वाही देणाऱ्या चित्रपटांचेही या वाहिनीवरुन प्रसारण करण्यात येत असे.  पण आचारसंहितेच्या विरोधात असल्याने निवडणूक आयोगाने या चॅनलवर बंदी आणली आहे. नमो टीव्ही हे नमो एपचा एक भाग असून भाजपा आयटी सेलद्वारे चालवला जात असल्याच भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले. या चॅनलचे प्रसारण 31 मार्च पासून सुरू झाले. 

Image result for namo tv zee news

निवडणूक आय़ोगाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रमाणित सामग्रीशी संबंधित असणारं कोणतंही पोस्टर किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपात कोणत्याची उमेदावाराच्या प्रचारार्थ वापरण्यात येण्याची शक्यता आहे, त्या गोष्टी आचारसंहिता सुरू असेपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रदर्शित केल्या जाऊ नयेत असं म्हणण्यात आलं आहे. या वाहिनीच्या प्रसारणानंतरच विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर आळवत निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. निवडणुकीच्या काळात चॅनलवर 24 तास एकाच पक्षाचा प्रचार करणे हे नैतिकतेला धरून नसल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. भाजपा तसेच पंतप्रधान मोदींच्या ट्वीटर हॅंडलवरून अनेकदा नमो टीव्हीच्या पोस्ट पाहायला मिळाल्या. अशावेळी पंतप्रधानांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचे म्हणणे हे गंभीर असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.