मुंबई : चीनमध्ये उदयास आलेलं कोरोना व्हायरस हे वादळ अद्यापही शमलेलं नाही. या व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यासाठी प्रत्येक देशात अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात येत आहेत. या धोकादायक विषाणूचा वाढता प्रकोप पाहता अनेक देश लॉकडाउन करण्यात आले आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फक्त लॉकडाउनवर भागणार नसल्याचं सांगितले आहे.
न्यूज एजेन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओचे माईक रायन म्हणाले की केवळ लॉकडाउनमुळे विषाणूपासून मुक्ती मिळू शकत नाही. यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे देशात जेवढे कोरोना व्हायसरग्रस्त लोक आहेत त्यांना शोधून काढणे. त्याचप्रमाणे अशा संशयित लोकांना देखरेखीखाली ठेवणे. असं केल्यास कोरोना व्हायरसचा फैलाव रोकला जावू शकतो.
माईक रायन म्हणाले, जेव्हा लॉकडाउन संपेल आणि नागरिक पुन्हा आपल्या कामाला सुरवात करतील तेव्हा लाखोंच्या संख्येने लोक बाहेर पडतील. परिणामी कोरोनाचा प्रसार अधिक होवू शकतो. त्यामुळे कोरोना बाधितांचा शोध घेणे तितकचं गरजेच आहे.
याच पार्श्वभूमीवर चीन, सिंगापूर, उत्तर कोरिया या देशांनी जेव्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी संशयित रुग्णाचा शोध घेणं सुरू केलं. आता परिस्थिती पाहता सर्वच देशांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे.
यामुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. त्याचप्रमाणे सरकारी निर्देशांबाबत नागरिकांच्या अनास्थेमुळे अखेर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी महाराष्ट्रात अखेर संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.