आधार - पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी, जोडणी करण्यासाठी सोपी युक्ती...

सरकारनं आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीची ही सहावी वेळ आहे

Updated: Apr 1, 2019, 11:32 AM IST
आधार - पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी, जोडणी करण्यासाठी सोपी युक्ती... title=

नवी दिल्ली : 'बायोमॅट्रीक ओळख क्रमांक' असलेला 'आधार' आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं अर्थात सीबीडीटीनं घेतलाय. पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलीय. दरम्यान, यापुढं आयकर भरण्यासाठी आधार आणि पॅन क्रमांकाची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलंय. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

सीबीडीटीनं एका अधिकृत वक्तव्याद्वारे ही माहिती देण्यात आलीय. सरकारनं आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीची ही सहावी वेळ आहे. सरकारनं गेल्या वर्षी जून महिन्यात पहिल्यांदा, प्रत्येक व्यक्तीला ३१ मार्चपर्यंत आपला आधार आणि पॅन जोडण्यास सांगितलं होतं. सोबतच यापुढे म्हणजेच, १ एप्रिल २०१९ पासून आयकर परतावा भरताना आधार क्रमांकाचा उल्लेख करणंही बंधणकारक करण्यात आलंय.

बँक खात्यांसाठी आधार अनिवार्य नाही

पाच सदस्यीय संविदानाच्या खंडपीठानं २६ सप्टेंबर २०१८ रोजी एक महत्त्वाचा निर्णय सुनावला होता. या निर्णयात केंद्राच्या आधार योजनेला संविधानिक रुपात वैध करार देत हे स्पष्ट करण्यात आलं होतं की, आयकर परतावा दाखल करण्यासाठी आणि नवा पॅन क्रमांक मिळवण्यासाठी आधार अनिवार्य असेल... परंतु, बँक खात्यांसाठी आधार जोडणी आवश्यक नसेल, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं होतं. तसंच मोबाईल कनेक्शनसाठीही दूरसंचार सेवा कंपन्या आधारसाठी सक्ती करू शकत नाहीत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.

एसएमएसद्वारे जोडणी करण्यासाठी

‘यूआयडीपीएएन’ फॉरमॅटमध्ये आधार आणि पॅनचे क्रमांक लिहून तो मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवूनही आधार आणि पॅन जोडता येणे शक्य आहे. मात्र, ज्यांचे नाव पॅन आणि आधार कार्डवर एकसारखे आहे, त्यांच्यासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे.

आधार-पॅन कार्ड ऑनलाईन जोडणीसाठी

https://portal.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaa... ही लिंक ओपन केल्यानंतर आलेला फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तुमचा पॅन कार्डनंबर हाच तुमचा आयडी असतो. हा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मोबाईल आणि मेल आयडीवर ओटीपी(वन टाईम पासवर्ड) येईल. हा ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल.