लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख

लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी आज पदभार स्वीकारला

Updated: Dec 31, 2019, 12:27 PM IST
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख title=
फोटो सौजन्य : एएनआय

नवी दिल्ली : लष्करप्रमुख म्हणून मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज पदभार स्वीकारला आहे. जनरल बिपीन रावत आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले आहेत. गेले सहा महिने ते व्हॉईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम पाहत होते. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांच्यावर देशाच्या सामरिक व्यवस्थापनात सर्वोच्च स्तरावर होणाऱ्या महत्वाच्या बदलांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी आहे. मूळचे पुण्याचे असलेले नरवणे हे ज्ञान प्रबोधिनी शाळेचे विद्यार्थी आहे. 

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले. मात्र लगेच ते तीनही सैन्यदलांचे प्रमुखपद म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद स्वीकारणार आहेत. जनरल रावत वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत या पदावर राहतील. तीनही सेनादलांशी संबंधित मुद्द्यांवर ते संरक्षणमंत्र्यांना सल्ला देतील. 

जनरल बिपिन रावतांची देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर नियुक्ती

सोमवारी जनरल रावत यांनी या संदर्भात तीनही सैन्यदलांचे सरसेनापती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशीही चर्चा केली. संरक्षण आणि सुरक्षा या संदर्भातल्या सर्व मुद्द्यांवर सरकारला सल्ला देण्याचं काम सीडीएस जनरल रावत करणार आहेत. कोणत्याही लष्करी कारवाईत तीनही सेनादलांची एकत्रित कारवाईबाबत योग्य ते नियोजन सीडीएस करणार आहेत. तसंच तीनही सैन्यदलांचा एकत्रित आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कामही जनरल रावत करणार आहेत.