leaders : 2 रुपये ते 500 कोटींचा प्रवास खडतर होता, पण तिच्यासाठी अशक्य नव्हता

तिचा हा प्रवास तसा सोपा नव्हता, परंतु तिच्या इच्छेपुढे तो अशक्य देखील नव्हता. जे तिने आज शक्य करुन दाखवलं आहे.

Updated: Nov 8, 2021, 06:55 PM IST
leaders : 2 रुपये ते 500 कोटींचा प्रवास खडतर होता, पण तिच्यासाठी अशक्य नव्हता title=

मुंबई :  नेहमी लक्षात ठेवा की कोणतेही मोठे यश हे एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो, तरच यशाची उंची गाठता येते. प्रत्येक मोठ्या यशामागे मोठा संघर्ष असतो. पण रात्रंदिवस लढण्याची ताकद कुठून येते? ही ताकद येते प्रेरणेतुन काही तरी करण्याच्या इच्छेतुन आणि याच इच्छेमुळे एका छोट्या गावतील मुलगी आज 500 कोटींची मालकीन आहे. तिचा हा प्रवास तसा सोपा नव्हता, परंतु तिच्या इच्छेपुढे तो अशक्य देखील नव्हता. जे तिने आज शक्य करुन दाखवलं आहे.

जिद्दीचा आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात

कल्पना यांचा जन्म 1961 मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा या छोट्याशा गावात झाला. कल्पनाचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांचा पगार फक्त 300 रुपये होता, ज्यामध्ये कल्पनाचे 2 भाऊ - 3 बहिणी, आजी-आजोबा आणि काका यांचे संपूर्ण कुटुंब होते. अशाप्रकारे मोठे कुटुंब असल्याने वडिलांच्या पगाराच्या घराचा खर्च नीट चालत नव्हता.

कल्पना या 12 वर्षांच्या होत्या आणि सातवीत शिकत होत्या, तेव्हा समाजाच्या दबावाखाली त्यांच्या वडिलांनी शिक्षण सोडायला लावलं आणि कल्पनापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या मुलाशी लग्न करुन दिलं. लग्नानंतर त्या मुंबईत राहायला गेल्या जिथे त्यांना सासरच्या लोकांचा अत्याचार सहन करावा लागला.

या सर्व प्रकारानंतर कल्पनाची प्रकृती इतकी बिघडली होती की, जेव्हा त्यांचे वडील ६ महिन्यांनी त्यांना भेटायला आले, तेव्हा त्यांची अवस्था पाहून वडिलांनी त्यांना सोबत गावी घेऊन गेले.

कल्पना यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विवाहित मुलगी माहेरी आली की समाज तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. आजूबाजूचे लोक टोमणे मारायचे आणि सगळे प्रकार करायचे. वडिलांनीही पुन्हा त्यांना शिकवायचा प्रयत्न केला, पण इतकं दु:ख पाहणाऱ्या मुलीला कुठे अभ्यास करावासा वाटेल. समाजाने त्यांचे जगणे अवघड आणि मरणे सोपं केलं, ज्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि ते विष प्यायले. परंतु नशीबाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

त्यानंतर त्यांच्या मनात एक गोष्ट आली, त्यांनी विचार केला की, जर एखादी गोष्ट करून मरता येते, तर काहीतरी करून जगता देखील येऊ शकते. त्या घटनेनंतर त्यांना त्यांच्यात एक नवीन उर्जा जाणवली आणि त्यांनी आयुष्यात काहीतरी करायचे ठरवले.

या घटनेनंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न केला पण वय कमी आणि कमी शिक्षणामुळे त्यांना कोणतेही काम मिळू शकले नाही, म्हणून त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

गरीबी संपवण्याचा निश्चय

वयाच्या 16 व्या वर्षी कल्पना त्यांच्या काकांसोबत मुंबईत आल्या. त्यांना शिवणकाम माहीत होते, म्हणून काकांनी त्यांना कापड गिरणीत काम करायला नेले. त्या वेळी त्यांना शिलाई मशीन नीट चालवता न आल्याने धागा कटिंग करण्याचं काम दिलं गेलं, याचा तिला फक्त  दोन रुपये पगार मिळायचा.

कल्पनाने काही दिवस धागा कापण्याचे काम केले, पण लवकरच त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, त्यांनी मशीन चालवण्यास सुरुवात केली. ज्यासाठी त्यांना महिन्याला अडीचशे रुपये मिळू लागले. आता कुठे त्या चांगल्या आयुष्याची सुरूवात करणार, तेवढ्यात एक वाईट बातमी आली. काही कारणाने त्यांच्या वडिलांची नोकरी गेली आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत येऊन राहू लागले.

ज्यामुळे कल्पनावरती संपूर्ण घराची जबाबदारी पडली. परंतु आपण असं गरीबीत किती दिवस जगायचं म्हणून कल्पनाने आपली गरीबी संपवण्याचा निश्चय केला आणि लागली कामाला.

त्यानंतर त्यांनी त्यांच्याच घरात काही शिलाई मशीन बसवल्या आणि 16-16 तास काम केले. शिवणकामातून काही पैसे मिळाले, पण ते पुरेसे नव्हते, म्हणून मग त्यांनी व्यवसाय करण्याचा विचार केला. पण व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी सरकारकडून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या परिसरात एक माणूस होता जो कर्ज देण्याचे काम करत होता. परंतु तो व्यक्ती सुरूवातीला त्यांना भेटायला तयार नव्हता.

ज्यामुळे कल्पना रोज सकाळी ६ वाजता त्यांच्या घरासमोर जाऊन बसायची. बरेच दिवस झाले पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, पण 1 महिना उलटूनही कल्पना यांनी त्यांच्या घराभोवती फिरणे बंद करत नव्हती हे पाहून तो व्यक्ती त्यांच्याकडे बोलण्यासाठी आला.

त्याच माणसांकडून कल्पनाला कळले की ५० हजारांचे कर्ज हवे असेल तर १० हजार इकडे तिकडे भरावे लागतील. परंतु कल्पना यासाठी तयार नव्हत्या आणि अशा समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी काही लोकांसोबत एक संस्था स्थापन केली, जी लोकांना सरकारी योजनांबद्दल सांगायचे आणि कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करायचे. हळूहळू ही संस्था खूप लोकप्रिय झाली आणि समाजासाठी निस्वार्थीपणे काम केल्यामुळे कल्पनाजींना अनेक मोठ्या लोकांकडून ओळखही मिळाली.

कमानी ट्यूब्सची स्थापना

श्री एन आर कमानी यांनी कमानी ट्यूब्स या कंपनीची स्थापना 1960 मध्ये केली होती. सुरुवातीला ही कंपनी चांगली चालली, पण 1985 मध्ये कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील वादामुळे ही कंपनी बंद पडली. 1988 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आले, परंतु एका ऐतिहासिक निर्णयात कंपनीची मालकी कामगारांना देण्यात आली. परंतु तरीही कंपनी नुकसानात चालत असल्यामुळे या कंपनीला कोणत्या चांगल्या व्यक्तीच्या हातात देण्याचा कामगारांनी विचार केला.

त्यादरम्यान या कामगारांनी कल्पना यांचे नाव सुचवले, त्यांना माहित होते की, मातीचं सोनं करण्याची ताकद कल्पनामध्ये आहे, ज्यामुळे ते कल्पनाजींकडे गेले. कंपनीवरील केसेस आणि कर्ज पाहून प्रथम कल्पना यांनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिला. परंतु नंतर जेव्हा त्यांना कळले की, या कंपनीमध्ये काम करणाऱ्या 3 हजार 500 लोकांचे कुटूंब यामुळे रस्त्यावर येऊ शकतो, तेव्हा त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली

कल्पना जी उद्योग (कंपनी) च्या मालक बनल्या

कल्पना जी सन 2000 पासून एका कंपनीसाठी लढत होत्या आणि 2006 मध्ये कोर्टाने त्यांना कमानी इंडस्ट्रीजचे मालक बनवले. न्यायालयाने आदेश दिला की, कल्पना जी यांना बँकेचे कर्ज 7 वर्षांत परत करावे लागेल, परंतु त्यांनी ते 1 वर्षातच फेडले.

500 कोटींची कंपनी बनवली

न्यायालयाने त्यांना कामगारांचे थकीत वेतन तीन महिन्यांत अदा करण्यास सांगितले. त्यानंतर कल्पना त्यांनी कंपनीचे आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू एका दिवाळा निघालेल्या कंपनीला यातून बाहेर काढले आणि एक मोठी कंपनी बनवली. कल्पना सरोजची ही कंपनीची किंमत आज 500 कोटींहून अधिक आहे.

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी, त्यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आणि कोणतीही बँकिंग पार्श्वभूमी नसता नाही, सरकारने त्यांना भारतीय महिला बँकेच्या संचालक मंडळात देखील समाविष्ट केले आहे.