नोएडा : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानात सर्वात कमी मतदान नोएडा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघाची एक वेगळी परंपरा असल्याने येथे कोणताही उमेदवार वा कोणत्याही पक्षाचे प्रमुख नेते प्रचाराला येत नाहीत. त्यांच्यासाठी ही भूमी अशुभ आहे.
उत्तर प्रदेशची सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहणारे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी तर गेल्या 11 वर्षांपासून नोएडाच्या भूमीवर पाऊल ठेवलेले नाही. 2012 ते 2017 या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते एकदाही नोएडात आले नाहीत.
निवडणुक प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा ताफा रात्री 11 च्या दरम्यान नोएडाच्या लुहाली (दादरी) टोल प्लाझावर पोहोचला. पाऊस असूनही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते टोल प्लाझावर अनेक तास अखिलेशची वाट पाहत होते.
अखिलेश यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मात्र, अखिलेश गाडीतून खालीही उतरले नाहीत. सपा प्रमुखांनी आपल्या रथाची खिडकी उघडली, हात हलवला आणि ते तसेच पुढे दिल्लीला निघून गेले. अखिलेश खाली येऊन भेटतील ही कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली.
नोएडाच्या भूमीला घाबरण्याचे कारण म्हणजे या भूमीबाबत पसरलेली अंधश्रद्धा. जेव्हा जेव्हा या भूमीला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. तेव्हा त्या त्या मुख्यमंत्रांची सत्ता गेली असा येथील नेत्यांचा समज आहे. 1980 पासून असे 5 वेळा असे घडल्यामुळे यावर त्यांचा अधिक विश्वास बसला आहे.
1980 मध्ये एनडी तिवारी नोएडाला आले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावली. 1988 मध्ये वीर बहादूर सिंग, 1995 मध्ये मुलायम सिंग, 1997 मध्ये मायावती आणि 1999 मध्ये कल्याण सिंग यांच्याबाबतही असेच घडले. 2011 मध्ये मायावतीही नोएडामध्ये आल्या आणि 2012 मध्ये सत्तेतून बाहेर पडल्या.
योगी आदित्यनाथ यांची सत्ता जाणार का?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मात्र या अंधश्रद्धेवर विश्वास नाही. आपल्या कार्यकाळात ते 20 हून अधिक वेळा नोएडाला आले होते. मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री योगी 23 डिसेंबर 2017 रोजी नोएडा येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएडाच्या निमित्ताने अखिलेश यांना अंधश्रद्धाळू म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. तर, येथे कोणताही मुख्यमंत्री येऊ शकत नाही. या समजुती चुकीच्या आहेत असे न बोलता योगीजींनी आपल्या आचरणाने ते सिद्ध केले आहे. आधुनिक युगात हे होऊ शकत नाही, असे म्हटले होते.
आता या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यासमोर अखिलेश यादव यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. जर या निवडणुकीत योगींचा पराभव झाला तर या भूमीचा हा पायगुण असल्याच्या समजावर शिक्कामोर्तब होईल आणि ते जर विजयी झाले तर हा समज मोडून काढण्यात यशस्वी होतील. त्यामुळे योगी यांचे भवितव्य ही भूमी ठरवणार हे निश्चित...