आंध्र प्रदेश-तेलंगणात इतर राज्यातून परतलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह

कल्याणमधून गेलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती

Updated: May 13, 2020, 11:48 AM IST
आंध्र प्रदेश-तेलंगणात इतर राज्यातून परतलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह title=

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत इतर राज्यांतील मजूर अडकले आहेत. त्यांना आपल्या राज्यात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. कामगारांना परत आणण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालविली जात आहे. परप्रांतील कामगार इतर राज्यांमधून आपल्या राज्यात येत असल्यामुळे राज्यांचे आव्हान आणखी वाढले आहे. दक्षिण भारत, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील स्थलांतरित कामगारही महाराष्ट्र व गुजरातमधून आपल्या राज्यात परतत आहेत.

या राज्यांमधून कामगार परत आल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातून परत आलेल्या परप्रांतीय कामगारांपैकी तेलंगणातील 25 मजुरांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. आंध्र प्रदेशमधील 37 मजुरांचा रिपोर्ट ही पॉझिटीव्ह आला आहे. कल्याण येथून हे मजूर आले आहेत अशी माहिती आहे.

या संदर्भात, आंध्र प्रदेशचे विशेष सचिव (आरोग्य, वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण) के एस जवाहर रेड्डी यांनी म्हटलं की, 250 प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 28 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. परप्रांतातून कामगार, यात्रेकरू आणि विद्यार्थी राज्यात परतत असल्यामुळे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंत वाराणसीहून परत आलेल्या 10 यात्रेकरूंचा आणि चेन्नईहून आलेल्या 30 प्रवाशांचा रिपोर्ट ही पॉझिटीव्ह आला आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधून मोठ्या संख्येने कामगार आपल्या राज्यात परतताना या दोन्ही राज्यात रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही रेल्वे सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याचा धोका वाढेल.