बंगळुरू : कर्नाटकामध्ये आठवड्याभरात दुसरा शपथविधी सोहळा रंगणार आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर एच.डी. कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. तर अपेक्षेप्रमाणे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागलीय. कुमारस्वामी यांच्यासह जी. परमेश्वर यांचाही शपथविधी बुधवारीच पार पडणार आहे. विधानसभा सभापतीपदी काँग्रेसचे के. आर. रमेशकुमार यांची निवड करण्यात आलीय. जेडीएसला मुख्यमंत्रिपद आणि १२ मंत्रीपदं तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आणि २२ मंत्रिपदं आलीत.
शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी चिकमंगळुरच्या शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. एकीकडे जेडीएस-काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असताना भाजप मात्र निषेध आंदोलन करणार आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरुमध्ये काळे झेंडे घेऊन भाजप नेते आणि कार्यकर्ते जेडीएस-काँग्रेसविरोधात आंदोलन करतील. कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला भाजपविरोधक एकवटणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून विरोधकांचं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. पाहूया कोण कोण उपस्थित राहणार आहेत.
कुमारस्वामी यांच्या शपथविधीला दिग्गज नेते उपस्थित राहून भाजपविरोधात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, चंद्रबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदर सिंग, मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, के.चंद्रशेखर राव, एम.के.स्टॅलिन हे नेते या शपथविधी सोहळ्याला येणार आहे.