मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्यानंतर त्या किंमती कमी करण्यासाठी काही राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यात राजस्थान आणि आंध्र प्रदेशने देखील पेट्रोलची किंमत कमी केली आहे, आता कर्नाटकमध्ये देखील पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पेट्रोल-डिझेलची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे कर्नाटकात पेट्रोल-डिझेलमागे प्रति लीटर कमीत कमी २ रूपये कमी होणार आहे.
यासाठी आज सरकारकडून नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे. कर्नाटकात आज रात्रीपासून नवीन किंमती लागू होणार आहेत.कर्नाटकात कुमारस्वामी यांनी, पेट्रोल-डिझेलची किंमत कमी करून दाखवली, तसं महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करून दाखवतील का?
सध्या कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पेट्रोल ८४.५९ प्रति लीटर आहे, सोमवारी बंगळुरूत पेट्रोलचे भाव २९ पैशांनी वाढले होते. बंगळुरूत डिझेल ७६ रूपये १० पैसे प्रती लीटर आहे.
कुमारस्वामी यांनी आपला पहिला बजेट सादर केला होता, त्यांनी यात पेट्रोल डिझेलच्या किंमती २ टक्के वाढवण्याची घोषणा केली होती, त्यांच्या या घोषणेनंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. यानंतर आता राज्य सरकारकडून लावला जाणारा काही टॅक्स कमी केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार आहेत.