कुलभूषण जाधव यांना आज कॉन्स्युलर एक्सेस मिळणार

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत द्यावी, असा भारताचा आग्रह आहे.

Updated: Sep 2, 2019, 11:09 AM IST
कुलभूषण  जाधव यांना आज कॉन्स्युलर एक्सेस मिळणार title=

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज कॉन्स्यूलर एक्सेस मिळणार आहे. त्यामुळे भारतीय दूतावासातील अधिकारी आज कुलभूषण जाधव यांना भेटू शकतील. 

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कुलभूषण जाधव यांना सशर्त कॉन्स्यूलर एक्सेस देण्यात येईल. कुलभूषण जाधव यांना हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कॉन्स्यूलर एक्सेस देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते. त्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सशर्त कॉन्स्यूलर एक्सेस देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत द्यावी, असा भारताचा आग्रह आहे.

कुलभूषण जाधव केसमध्ये भारताचा १ रुपया तर पाकिस्तानचे इतके कोटी खर्च

मात्र, पाकिस्तानने कॉन्स्यूलर एक्सेससाठी काही अटी ठेवल्या आहेत. जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट होईल त्याठिकाणी पाकचा एक अधिकारी उपस्थित राहील. तसेच भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि भारतीय अधिकारी आणि जाधव यांच्यातील चर्चा रेकॉर्ड केली जाईल. त्यामुळे आता भारत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही भारताने पाकिस्तानचा कुलभूषण भेटीचा सशर्त प्रस्ताव फेटाळला होता.

मला खात्री आहे, कुलभूषण जाधव यांना न्याय मिळणार - नरेंद्र मोदी