नवी दिल्ली : रामदेव बाबा योगाच्या माध्यमातून पहिले घराघरात पोहोचले. यानंतर भ्रष्टाचाराविरोधातल्या आंदोलनामध्येही रामदेव बाबांनी सहभाग घेतला. पण आता बाबा रामदेव उद्योजक म्हणून यशस्वी होताना दिसतायत. रामदेव बाबांच्या पतंजलीनं काही कालावधीमध्येच १० हजार कोटींची उलाढाल केली आहे.
डिटर्जंट, शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, देशी तूप, दुध, ज्यूस, तेल यांच्यासारख्या वस्तू बाजारात आणल्या. रामदेव बाबांच्या पतंजलीचा सध्या हरीद्वारमध्ये प्लांट असून थोड्याच दिवसात रामदेव बाबांचे आणखी पाच प्लांट सुरु होणार आहेत. रामदेव बाबांचं यावर्षी ३० ते ४० हजार कोटींचं लक्ष्य असून पुढच्या वर्षी ६० हजार कोटी रुपयांचं लक्ष्य पतंजलीनं ठेवलं आहे. सगळे प्लांट सुरु झाल्यावर रामदेव बाबांच्या पतंजलीची उलाढाल एक लाख कोटीपर्यंत जाईल.
रामदेव बाबा स्वदेशी जिन्स आणि ४० हजार प्रायव्हेट सिक्युरिटी मार्केटमध्येही पाऊल ठेवणार आहेत. BARCनं दिलेल्या आकडेवारीनुसार पतंजली सध्या एफएमसीजी प्रॉडक्ट्सच्या जाहिराती करणारी क्रमांक एकची कंपनी बनली आहे. रामदेव बाबा पतंजलीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. ग्लोबल रिसर्च फर्म इप्सोसनं फेसबूक आणि गुगलसोबत पतंजलीचा देशातल्या टॉप १० ब्रॅण्ड्समध्ये समावेश केला आहे.
मी कधीही छोटा विचार करत नाही. मी पतंजली समुहाच्या पुढच्या १०० वर्षांबाबत विचार केला आहे. मी माझ्या उत्तराधिकाऱ्याला मागे सोडून जाईन, असं रामदेव बाबा म्हणालेत. १० हजार कोटी रुपयांच्या पतंजलीचा उत्तराधिकारी कोणीही व्यापारी नसेल तर ५०० साधूंची टीम पतंजलीची उत्तराधिकारी असेल, असं रामदेव बाबा एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हणाले.