तुमच्या आधार कार्डचा कुठे वापर झाला शोधणे आता सहज शक्य

आधार कार्ड हा सध्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा दस्तावेज झाला आहे. कोणतेही काम असले की आधार कार्डची छायाप्रत मागितली जाते.

Updated: Jan 9, 2019, 02:25 PM IST
तुमच्या आधार कार्डचा कुठे वापर झाला शोधणे आता सहज शक्य title=

नवी दिल्ली - आधार कार्ड हा सध्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा दस्तावेज झाला आहे. कोणतेही काम असले की आधार कार्डची छायाप्रत मागितली जाते. ओळखीचा किंवा राहण्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्डच मागितले जाते. अर्थात आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या निकालात त्याचा वापर करण्यावर प्रतिबंध घातले होते. म्हणजेच मोबाईल क्रमांकासाठी आधार कार्ड आवश्यक नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. त्याचबरोबर आधार कार्डच्या साह्याने जमा केलेली ग्राहकांची वैयक्तिक माहिती आपल्या डेटाबेसमधून काढून टाकण्याचे निर्देशही मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना देण्यात आले होते. तरीही आजही विविध कामांसाठी आधार कार्डची मागणी केली जाते. आपल्या आधार कार्डचा कुठे कुठे वापर करण्यात आला आहे. हे आता नागरिकांना समजू शकणार आहे. त्यासाठी UIDAIने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. ज्या माध्यमातून आधार कार्डचा वापर कुठे करण्यात आला हे समजू शकणार आहे. 

सर्वात आधी https://resident.uidai.gov.in ही वेबसाईट उघडावी. वेबसाईटवरील आधार 'ऑथेंटिकेशन हिस्ट्री' पेजवर जाण्यासाठी संबंधित लिंकवर क्लीक करा. त्यानंतर आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड तिथे भरण्यात यावा. त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लीक करावे. आधारशी जोडलेल्या तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. यासाठी आधारशी जोडलेला मोबाईल तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. 

मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर अपडेट केल्यावर तिथे विचारण्यात आलेली अन्य माहितीही भरली जावी. यामध्ये कालावधी आणि व्यवहारांची संख्या यांची आकडेवारी द्यावी लागेल. त्यानंतर Submit बटणावर क्लीक करावे. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या कालावधीमध्ये तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे कुठे करण्यात आला हे समजू शकेल. पण कोणी वापर केला हे मात्र या पेजवर समजू शकणार नाही. 

आधारशी जोडलेली कोणतीही माहिती संशयास्पद असल्याचे जाणवल्यास ऑनलाईन पद्धतीने ही माहिती लॉकही करता येईल. जेव्हा तुम्हाला माहिती वापरायची असेल, तेव्हा तुम्ही ती त्या कालावधीसाठी अनलॉकही करू शकता.

Tags: