तुम्हाला SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे माहित आहेत का? जाणून घ्या

तुम्ही बँकांमध्ये झिरो बॅलन्स बचत खाते देखील उघडू शकता. त्याचे काही फायदे आहेत आणि काही मर्यादाही आहेत.

Updated: Jul 5, 2022, 05:28 PM IST
तुम्हाला SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे माहित आहेत का? जाणून घ्या title=

SBI Zero Balance savings account: जेव्हा तुम्ही बँकेत बचत खाते उघडता, तेव्हा तुम्हाला किमान शिल्लक राखावी लागते. परंतु तुम्ही बँकांमध्ये झिरो बॅलन्स बचत खाते देखील उघडू शकता. त्याचे काही फायदे आहेत आणि काही मर्यादाही आहेत. येथे आम्ही SBI झिरो बॅलन्स बचत खात्याबद्दल सांगणार आहोत.. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, वैध केवायसी पूर्ण करून कोणीही बँकेच्या कोणत्याही शाखेत झिरो बॅलन्स खाते उघडू शकतो.

फायदे आणि मर्यादा काय आहेत? जाणून घ्या

तुम्हाला या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. तसेच खात्यात पैसे ठेवल्यास कोणतीही कमाल मर्यादा नाही. या खातेदाराला बेसिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड जारी केले जाते. या कार्डवर कोणतेही वार्षिक शुल्क देखील आकारले जात नाही. या खातेदाराला चेकबुक दिले जात नाही. शाखेत किंवा एटीएममधून फॉर्म भरून बँकेतून पैसे काढता येतात.

मनी ट्रान्सफर आणि खाते बंद करणे

एसबीआय झिरो बॅलन्स खात्याअंतर्गत, एनईएफटी/आरटीजीएस सारख्या इलेक्ट्रॉनिक चॅनेलद्वारे पैसे घेणं किंवा हस्तांतरित करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. जर तुम्ही बंद खाते सक्रिय केले तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमचे शून्य शिल्लक खाते बंद केले तर त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

तुमच्याकडे आधीच बचत खाते असल्यास...

येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे आधीच झिरो बॅलन्स किंवा बेसिक सेव्हिंग खाते असेल तर दुसरे कोणतेही बचत खाते असू नये. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुमच्याकडे आधीपासूनच बचत खाते असेल आणि तुम्ही शून्य शिल्लक बचत खाते देखील उघडले असेल, तर पूर्वीचे खाते 30 दिवसांच्या आत बंद करावे लागेल. झिरो बॅलन्स सेव्हिंग खातेधारक त्यांच्या बँक किंवा इतर बँकेच्या एटीएम किंवा शाखा चॅनेलमधून एका महिन्यात चार वेळा पैसे काढू शकतात.