नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणी हरियाणातील अध्यात्मिक गुरू डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंगला सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. हे बलात्कार प्रकरण १० वर्षांपूर्वीचं आहे.
त्यावेळी पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की, राम रहीमने तिला रात्री गुहेत बोलवलं होतं. साधारण १०० एकर परिसरात विस्तारलेल्या गुरमीत राम रहीमच्या आश्रमाच्या मधोमध एक काचेचं भवन आहे. यालाच राम रहीमची गुहा म्हणतात. या गुहेत जाण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. गुरमीतची गाडी सरळ आत जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
गुहेपर्यंतच्या रस्त्यात काही साध्या वेषात आणि काही कमांडोच्या रूपात बंदुकधारी तैनात आहेत. राम रहीमच्या या गुहेत शानदार सोफा आणि चमकदार पडदे असलेला एक हॉल आहे. इथे २०९ सेविकांची खास निवड केली जाते. यातील काहींनाच गुहेत जाण्याची परवानगी असते. गुहेच्या आत जाण्यासाठी बायोमेट्रीक सिस्टीम आहे. ओळखपत्र असल्याशिवाय तो दरवाजा उघडत नाही.
या सेविका साध्वीसारख्या खास पांढ-या रंगांचे कपडे परिधान करतात आणि केस मोकळे सोडतात. तसेच या सेविका गुरमीतला जेवणे देणे, भेटी घडवणे आणि सकाळ-संध्याकाळ स्टेजपर्यंत घेऊन जाणे हे काम करतात. राम रहीमच्या डाव्या बाजूला यांच्यासाठी एक खास प्रकारची जागा तयार करण्यात आली आहे.
या गुहेत गुरमीतला तयार होण्यासाठी खास जागा आणि खास लोकांना भेटण्यासाठी एक रूम आहे. इथेच गुरमीतकडे इतर देशांमध्ये थेट संपर्क साधण्यासाठी हॉटलाईनही आहे. या गुहेत ऎशोआरामाची प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. ज्या स्टेजवरून गुरमीत प्रवचन देतो, त्या स्टेजला खालून चाकं लावलेली आहेत. त्याचे कपडेही खास चंदीगढहून डिझायनरकडून तयार करून घेतले जातात.
राम रहीमच्या या गुहेत एक एनआरआय गेस्ट हाऊस सुद्धा आहे. ज्यात शानदार रूम्स, स्विमिंग पूल आणि रिवॉल्विंग रेस्टॉंरंट आहे. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखी सुविधा यात आहे. यासोबतच आश्रमात पेट्रोल पंपही आहे. आश्रमातील गाड्यांना पासेसवर इथे पेट्रोल मिळतं. या आश्रमात सगळंच पिकवलं जातं. धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळं सगळंच पिकवलं जातं.
या आश्रमातच लोक शर्ट-पॅंट आणि इतर कपडे तयार करतात. आश्रमात आत फिरण्यासाठी एक बॅटरीची कारही आहे. इतकेच नाहीतर या आश्रमात एक वॉशिंग मशीन आहे. या मशीनमध्ये एकाचवेळी १० ते १५ हजार कपडे एकत्र धुतले जातात. या आश्रमात सीसीटीव्ही तर आधीपासून आहेच. आता एक कंट्रोल रूमही आहे. ज्यातून देशभरातील टीव्ही चॅनल्सवर मॉनिटरींग केलं जातं. राम रहीमच्या बातम्यांचं रेकॉर्डींग केलं जातं.