Heatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम

Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा.   

Updated: Mar 10, 2023, 11:11 AM IST
Heatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम  title=
Kerala weather hits 54 degrees feels like temprature heat wave latest Marathi news

Kerala Temperature Crosses 54 Degree: महाराष्ट्रात ज्याप्रमाणं फेब्रुवारी महिन्यात (Maharashtra weather) सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली होती अगदी त्याचप्रमाणं किंबहुना त्याहूनही अधिक तीव्रतेनं देवभूमी केरळात सूर्याचा प्रकोर पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या केरळाला पावसानं झोडपलं होतं तिथं आता तापमानानं सर्व विक्रम मोडल्याचं पाहायला मिळत आहे. केरळमधील बहुतांश भागांमध्ये तापमानानं 54 अंशांचाही आकडा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं केरळातील जनजीवनावर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. 

केरळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (KSDMA) गुरुवारी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये राज्यातील काही भागामध्ये 'feels like temperature' 54 अंशांवर पोहोचल्याचं दाखवलं गेलं. यंत्रणांच्या मते हे तापमान संकटसूचक असून, येत्या दिवसांत अनेक आजार आणि उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल. 

कोणकोणत्या ठिकाणी उष्णतेनं मोडले विक्रम? 

केरळचा दक्षिणी भाग, अलपुढ्झा, कोट्टायम, कण्णूर या जिल्ह्यांमध्ये तापमानानं 54 अंशांचा आकडा गाठला. तर, तिरुवअनंतपूरम, कोल्लम, एर्नाकुलन, कोझिकोड इथं 'feels like temperature' 45 ते 54 अंशांमध्ये राहिलं. प्रशासनाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार असून, दीर्घ काळासाठी इथं उष्माघाताचा त्रास अनेकांनाच होऊ शकतो. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : हवामानाची ऐशी की तैशी; महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट, उत्तरेकडे पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा 

एकिकडे केरळमधील काही भागात आश्चर्यकारकरित्या तापमानात वाढ झालेली असतानाच दुसरीकडे मल्लपुरम, पठानमथिट्टा, एर्नाकुलम, कासरगोड या भागात तापमान 40 ते 45 अंशांदरम्यान असल्याचं जाणवत आहे, तर एडुक्की आणि वायनाड या डोंगराळ भागात तापमान 29 अंशांवर असल्याची माहिती समोर येत आहे. 

केरळच्या पालक्कडमध्ये यंदाच्या वर्षी तुलनेनं उन्हाचा दाह कमी प्रमाणात जाणवत आहे. इथं तापमानाचा आकडा 30 ते 40 अंशांच्या दरम्यान आहे. केरळमधील आरोग्य विभागाकडून सदरील परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करम्यात आलं आहे. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. 

उष्माघात म्हणजे काय, तो कसा टाळाल?

हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघात. शरीर तापमानात संतुलन राखण्यास असमर्थ असतं तेव्हा ही परिस्थिती उदभवते. उष्माघात झाल्यास शरीराचं तापमान वाढू लागतं, ते कमी होण्यासाठी बराच वेळ जातो. या परिस्थितीत शरीरातून घाम येण्याची प्रक्रियाही अनेकदा निष्फळ ठरते. अनेकदा 10 ते 15 मिनिटांत व्यक्तीच्या शरीरातं तापमान 106 F पर्यंत पोहोचतं. वेळीच उपचार न मिळाल्यास अनेरदा व्यक्तीचा मृत्यूही ओढावतो. त्यामुळं पुरेसं पाणी पिण्याची सवय अंगी बाणवणं कधीही उत्तम.