Kerala Traffic Camera Issue: ट्रॅफिक पोलिसांनी काढलेल्या एका फोटोमुळे संसार उद्धवस्त! पती थेट तुरुंगात

Kerala Traffic Camera Issue: ही व्यक्ती ज्या स्कुटरवरुन महिलेसोबत जात होती ती स्कुटर या व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने रजिस्टर होती. त्यामुळेच अतीवेगाने गाडी चालवल्याप्रकरणी चलान भरावं लागेल हा मेसेज पत्नीला गेला अन् या व्यक्तीचा भांडाफोड झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 10, 2023, 05:53 PM IST
Kerala Traffic Camera Issue: ट्रॅफिक पोलिसांनी काढलेल्या एका फोटोमुळे संसार उद्धवस्त! पती थेट तुरुंगात title=
CCTV Traffic (REUTERS/Representative image)

Kerala Man In Trouble: केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरममध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेल्या सीसीटीव्हींमुळे वेगळाच वाद निर्माण झाला आहे. या कॅमेरांचा मूळ उद्देश बाजूला राहून त्यांचा सर्वांना त्रासच अधिक होत आहे. या कॅमेरांमुळे स्थानिक पोलिसांची डोकेदुखी वाढलेली असतानाच सर्वसामान्यांनाही या कॅमेरांमुळे वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार नुकताच समोर आला असून हेल्मेट न वापरता आपल्या एका मैत्रिणीबरोबर स्कुटरवरुन प्रवास करणारी एक स्थानिक व्यक्ती या सीसीटीव्ही कॅमेरांमुळे वेगळ्याच अडचणीत सापडली आहे.

नेमकं घडलं काय?

हेल्मेट न घालता वेगाने दुचाकीवरुन जाणाऱ्या या व्यक्तीचा फोटो 25 एप्रिल रोजी सिग्नलवरील हाय स्पीड सीसीटीव्ही कॅमेरांनी काढला. या फोटोंसहीत वेगाने वाहन चालवण्याप्रकरणी स्थानिक परिवहन शाखेने चलान या व्यक्तीच्या पत्नीला पाठवलं. मात्र या फोटोंमुळे या व्यक्तीच्या घरी कुटुंबकलह झाला असून प्रकरण थेट पोलीस स्थानकापर्यंत गेलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार इडुक्कीमधील रहिवाश्याबरोबर घडला आहे. ही व्यक्ती स्कुटरवरुन आपल्या मैत्रिणीबरोबर शहरातील रस्त्यांवरुन जात असतानाच त्याने हेल्मेट घातलं नव्हतं आणि तो प्रचंड वेगाने जात असल्याने त्याचा फोटो कॅमेराने काढला आणि तो थेट रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवला.

पत्नीला मेसेज गेला अन्...

विशेष म्हणजे ज्या गाडीवरुन ही व्यक्ती प्रवास करत होती ती त्याच्या पत्नीच्या नावाने रजिस्टर असल्याने फोटो काढल्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चलान भरावं लागणार असल्याचा मेसेज पत्नीला गेला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला यासंदर्भात जाब विचारला. तसेच गाडीवर मागील बाजूस बसलेली महिला कोण होती असा प्रश्नही या महिलेने पतीला विचारला. पतीने या महिलेला मी ओळखत नाही मी तिला केवळ लिफ्ट दिली होती असं पत्नीला सांगितलं. 34 वर्षीय पतीने दिलेला हा खुलासा पत्नीला पटला नाही. यावरुन या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली.  

या व्यक्तीला झाली अटक

5 मे रोजी या महिलेने करमाना पोलिस स्थानकामध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पतीने मला आणि 3 वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. "पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीला आयपीसी कलम 321, 341, 294 अंतर्गत अटक करण्यात आली आहे," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या व्यक्तीला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याला कोर्टाने न्यायलयीन कस्टडी सुनावली आहे.