Crime News: राजधानी दिल्लीत (Delhi) कार चालकाला भररस्त्यात थांबवून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणांनी रस्त्याच्या मधोमध दुचाकी लावल्या आणि कार थांबवली. यानंतर त्यांनी कारचालकाला मारहाण केली. कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात ही सगळी घटना कैद झाली होती. कारचालकाने ट्विटरला (Twitter) हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई केली असून आरोपी तरुणांना अटक (Arrest) केली आहे.
प्रवीण जांगरा असं या कारचालकाचं नाव आहे. रविवारी रात्री काही तरुणांनी रस्त्यात त्यांची गाडी अडवली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रवीण यांनी कारच्या डॅशबोर्डमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ ट्विटरला शेअर करत या घटनेला वाचा फोडली. मिळालेल्या माहितीनुसार, हाय बीमच्या वापरावरुन हा वाद झाला असं सांगितलं जात आहे.
व्हिडीओत आरोपी तरुण कार जात असताना तिला थांबवण्याचा प्रयत्न करत दिसत आहेत. पण जेव्हा कार थांबत नाही तेव्हा ते आपल्या दुचाकी कारच्या समोर आणून थांबवतात. यानंतर ते प्रवीण यांना कानाखाली लगावतात. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तरुण उतरल्यानंतर चालकाच्या दिशेने जातात, यामुळे ते कॅमेऱ्यात दिसत नाही. पण प्रवीण यांना ते शिवीगाळ करत असल्याचं आणि मारहाण करत असल्याचं ऐकू येत आहे.
Some miscreants stopped me in the middle of the road and beat me up. All this happened at Nangloi Railway Station Metro. This type of hooliganism has become common in the capital of the country. @DelhiPolice should look into the matter and take strict action against these goons. pic.twitter.com/rBCJqctIQ8
— Praveen jangra (@ParveenHere) May 8, 2023
प्रवीण त्यांना वारंवार आपल्याला मारहाण का करत आहात? अशी विचारणा करत माफी मागत असल्याचंही ऐकू येत आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिडीओ ट्वीट केला आणि पोलिसांना कारवाई करण्याचं आवाहन केलं.
"काही बदमाशांनी मला रस्त्याच्या मधोमध अडवून मारहाण केली. हा सर्व प्रकार नांगलोई रेल्वे स्टेशन मेट्रोजवळ घडला आहे. देशाच्या राजधानीच अशा प्रकारची गुंडगिरी आता सामान्य झाली आहे. दिल्ली पोलिसांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि अशा गुंडांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे," असं ट्वीट प्रवीण यांनी केलं होतं.
They did this, we did this. pic.twitter.com/tGISHjTsmw
— HARENDRA K SINGH, IPS (@HarendraKS_IPS) May 10, 2023
यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीचे पोलीस उपायुक्त हरेंद्र के सिंह यांनी आज सकाळी ट्विट करून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. "त्यांनी ते केलं, आम्ही हे केलं," असं ट्वीट त्यांनी केलं असून तक्रार केलेल्या ट्वीट आणि आरोपींना अटक केल्याचा फोटो शेअर केला आहे.
दिल्लीच्या गोविंदपूर येथे काही दिवसांपूर्वी 4000 रुपयांसाठी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. रविवारी 7 मे रोजी ही घटना घडली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावं अंकित आणि मुकिम आहेत.