Relationship News : वैवाहिक नात्यांमध्ये (Married Life) कैक कारणांनी मतभेद होतात. अनेक कारणांनी हे मतभेद मिटतात किंवा मग त्यांना आणखी फाटे फुटत जातात. बऱ्याचदा वाद इतका विकोपास जातो की जोडपी विभक्त होण्याचा आणि मग घटस्फोटाचाच निर्णय घेतात. पण, अशाच एका जोडप्याच्या घटस्फोटाच्या अर्जावरील निर्णय सुनावताना केरळ उच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. क्रूरतेच्या नावाखाली घटस्फोटी मागणी करणाऱ्या या इसमाचा अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला.
पत्नीला स्वयंपाक करता येत नाही, ही काही क्रूरता झाली नाही. या कारणामुळं तुम्ही वैवाहिक नातं तोडू शकत नाही, सुनावणीदरम्यान असं निरीक्षण केरळ उच्च न्यायालयानं नोंदवलं. पत्नीवर अनेक आरोप करणाऱ्या पतीनं तिला स्वयंपाक करता येत नाही हा आरोप केंद्रस्थानी ठेवकत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण, न्यायालयानं त्यालाच फटकारलं.
घटस्फोटाची मागणी करत पतीकडून पत्नीला स्वयंपाक येत नसल्याची तक्रार उचलून धरण्यात आली. इथं याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन आणि सोमी थॉमस यांच्या खंडपीठानं हे कारण क्रूरता असूच शकतनाही असं स्पष्ट निरीक्षण नोंदवलं.
नातेवाईकांसमोर पत्नी आपला पाणउतारा करते, गैरव्यवहार करते असं म्हणत या इसमानं पत्नी आपल्यापासून दुरावा पत्करत असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. इतकंच नव्हे, तर ती आपल्यावर थुंकली आणि नंतर यासाठी क्षमाही मागितली. इतक्यावरच न थांबता तिनं आपली नोकरीही संकटात आणत थेट कंपनीमध्येच तक्रार दाखल केल्याचा पाढा तीनं न्यायालयापुढं मांडला.
पत्नीनं मात्र आपल्यावर लावण्यात आलेले हे सर्व आरोप फेटाळले. आपलं लैंगिक शोषण होत असून, पती कायमच आपल्या शरीराची थट्टा करत असल्याचंही तिनं आपल्या बचावात सांगितलं. आपल्या पतीला मानसिक आरोग्याच्या तक्रारी असून, तो त्यासाठीची औषधं घेत नाहीये असाही खुलासा तिनं इथं केला.
एकिकडे पतीकडून या नात्यातून विभक्त होण्यासाठीचा सूर आळवला जात असताना पत्नीनं मात्र हे नातं टीकवण्यासाठीचीच इच्छा व्यक्त केली. किंबहुना आपण हे नातं टीकवण्यासाठी म्हणूनच त्याच्या कंपनीमध्ये ईमेल केले असल्याचंही ती म्हणाली.
न्यायालयाकडून दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर पत्नीकडून कंपनीला पाठवण्यात आलेल्या EMail ची पडताळणी करण्यात आली. पतीला आपल्या पतीच्या वर्तणुकीबद्दल काळजी वाटत होती, कारण तो केरळहून पुन्हा युएईला गेला होता. आपल्या पतीसोबत नेमकं काय घडलंय याचीच विचारणा करण्यासाठी तिनं ते मेल केले होते. पतीला सर्वसामान्य आयुष्याच्या रुळावर पुन्हा आणण्यासाठीच तिनं हे प्रयत्न केले होते. परिणामी लग्नाचं नातं तोडण्याचा निर्णय हा एकतरफी नसू शकतो असं म्हणत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.