मदतीसाठी काँग्रेसचं अमिताभ यांना गाऱ्हाणं! आदित्यनाथांचं नाव घेत म्हणाले, 'आम्ही तुम्हाला..'

Kerala Congress Request To Amitabh Bachchan: काँग्रेसने आपल्या एक्स म्हणजेच आधीच्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत बीग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसेच अमिताभ यांच्याकडून का मदत मागितली जात आहे हे सुद्धा पक्षाने सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 31, 2024, 04:37 PM IST
मदतीसाठी काँग्रेसचं अमिताभ यांना गाऱ्हाणं! आदित्यनाथांचं नाव घेत म्हणाले, 'आम्ही तुम्हाला..' title=
अमिताभ यांना टॅग करत केली पोस्ट

Kerala Congress Request To Amitabh Bachchan: केरळ काँग्रेसने गुरुवार एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी उत्तर प्रदेशमधील ट्रेन्समधील गर्दीची समस्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. गोरखपूरहून निघणाऱ्या ट्रेनमधील हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडेच मदत मागितली आहे. केरळ काँग्रेसने त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन ही पोस्ट केली आहे.

हा आदित्यनाथ यांचा मतदारसंघ

"प्रिय, अमिताभ बच्चन, आम्हाला तुमच्याकडून छोटी मदत हवी आहे. कोट्यवधी सामान्य लोकांना अशाप्रकारे प्रवास करावा लागतो. अनेकदा राखीव डब्ब्यांमध्येही लोक गर्दीमध्ये दाटीवाटीत बसलेले असतात. उत्तर भारतामध्ये 52 डिग्री सेल्सीअस तापमान आहे. हा व्हिडीओ गोरखपूर इथला आहे जो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे," असं केरळ काँग्रेसने म्हटलं आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

हा व्हिडीओ वैशाली एक्सप्रेस ट्रेनमधील असून ट्रेनमध्ये दाटीवाटीने बसलेल्या प्रवासांना उष्णतेमुळे गर्मीचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे. हे प्रवासी प्लास्टीकच्या हातपंख्याने स्वत:ला हावा घालताना दिसत आहेत. केरळ काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरत देशाची लोकसंख्या मागील काही काळात 14 कोटींनी वाढली असताना त्या तुलनेमध्ये ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आलेली नाही, असं म्हटलं आहे. "आपण मागील काही काळात काही वंदे भारत ट्रेन्सचा समावेश नक्कीच केला आहे. मात्र त्यापैकी अर्ध्या ट्रेन कमी क्षमतेनं भरलेल्या असतात," असं काँग्रेसने म्हटलं आहे.

अमिताभ यांच्याकडे का मदत मागितली?

पुढे केरळ काँग्रेसने या ट्रेनच्या गर्दीसंदर्भात अमिताभ बच्चन यांच्याकडे मदत मागण्याचं कारण सांगितलं आहे. यापूर्वी अधिकृत माध्यमातून निवेदनांद्वारे या विषयाकडे केरळ काँग्रेसने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आमच्या विनंतीकडे फारसं लक्ष दिलेलं नाही. आम्ही जेव्हा ट्रेन्सची संख्या वाढवण्याची मागणी करतो तेव्हा त्याला प्रतिसाद दिला जात नाही मात्र जेव्हा सेलिब्रिटी किंवा प्रभावशाली व्यक्ती समस्या मांडतात त्यांना लगेच प्रतिसाद दिला जातो, असं केरळ काँग्रेसचं म्हणणं  आहे.

"तुमचा प्रभाव आणि सामाजिक विषयांबद्दल असलेली जाण पाहता, आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रकरमात लक्ष घालावं. तुम्ही यात लक्ष घातलं तर या लोकांना होणाऱ्या त्रासाकडे यंत्रणेचं लक्ष जाईल आणि तातडीने कारवाई केली जाण्याची शक्यता अधिक वाढेल," असं केरळ काँग्रेसने अमिताभ यांना टॅग करत म्हटलं आहे.

आता या प्रकरणावर रेल्वे यंत्रणेकडून काय उत्तर येतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.