Rahul Gandhi Home: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहुल गांधींना घर मिळवून देण्यासाठी अर्ज

Home For Rahul Gandhi Under PMAY: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार असलेल्या राहुल गांधींनी छत्तीसगडमधील अधिवेशनामध्ये केलेल्या विधानानंतर भाजपाची आगळी-वेगळी खेळी

Updated: Mar 2, 2023, 06:08 PM IST
Rahul Gandhi Home: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहुल गांधींना घर मिळवून देण्यासाठी अर्ज title=
Rahul Gandhi

Rahul Gandhi House Under PMAY: छत्तीसगड येथील रायपूरमध्ये काँग्रेसच्या 52 व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केलेल्या विधानावरुन भारतीय जनता पार्टीने (BJP) त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगण्याबरोबरच 52 वर्षांचा असूनही आपल्या नावावर आजही घर नाही असं म्हटलं होतं. मात्र आता याच विधानावरुन भाजपाने राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये भाजपाने राहुल गांधींना घर मिळावं यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान आवास योजनेमधून राहुल गांधींना घर मिळून देण्यासाठी भाजपाच्यावतीने अर्ज करण्यात आला आहे.

पदाधिकाऱ्यांनी लिहिलं पत्र

पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करताना राहुल गांधींनी आपल्या बालपणीच्या आठवणी अगदी भावूक होऊन सांगितल्या. मी 7 वर्षांचा असतानाच मला घर सोडवं लागलं. ते घरही सरकारी होतं. आज 52 वर्षानंतरही माझं स्वत:चं घर नाही, असं राहुल यांनी सांगितलं. यानंतर आता भाजपा राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. वायनाड येथील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कलपेट्टा नगरपालिकेच्या सचिवांना एक पत्र लिहिलं आहे. राहुल गांधींना घर द्यावं असं या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहुल गांधींच्या निवाऱ्याची सोय करुन त्यांना घर मंजूर करण्यात यावं असं आवाहन कलपेट्टा नगरपालिकेच्या सचिवांकडे पत्राद्वारे केलं आहे. 

राहुल नेमकं काय म्हणाले होते?

वयाच्या 7 व्या वर्षी आम्हाला राहता बंगला सोडून जावं लागलं होतं. हा सारा घटनाक्रम 1977 सालातील आहे. निवडणूक जवळ आली होती त्यामुळे घरी फारच वेगळं वातावरण होतं. त्यावेळेस मला फारसं काही कळत नव्हतं. मी आईला नेमकं काय सुरु आहे याबद्दल विचारलं. तेव्हा आईने मला आपण घर सोडत असल्याचं सांगितलं. आईने मला हे सांगण्याआधीपर्यंत ते घर आपलं आहे असं मला वाटत होतं. मात्र आईने मला ते घर आपलं नसल्याचं सांगितानाच बंगला सरकारी असल्याचं नमूद केलं होतं. मी आईला नेमकं आपण कुठे जाणार याबद्दल विचारलं असता तिच्याकडे उत्तर नव्हतं. मला काहीच कळत नव्हतं कारण माझ्यासाठी ते आमचं घरं होतं. आज 52 वर्ष झाली तरी माझ्याकडे स्वत:चं घर नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींना घर मिळालं तर...

राहुल गांधींना त्यांच्या मतदरासंघामध्ये घर आणि जमीन मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सांगत वायनाडचे भाजपा जिल्हाध्यक्ष केपी मधू यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींसाठी हे घर झालं तर त्यांना सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येथे येता येईल असा टोलाही मधू यांनी लगावला आहे.