Kashi Vishwanath Temple : भारतात असंख्य मंदिर असून हिंदू धर्मात मनोभावे पूजाअर्चा केली जाते. वाराणसी हे मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जाते. कारण इथे सर्वात अधिक मंदिरं आहेत. देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिरही वाराणसीत आहे. काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं पुरातन मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. वाराणसी हे शहर भगवान शिवाच्या त्रिशूळावर विसवलेले आहे असं म्हणतात. काशी विश्वेश्वरची महिमा देशविदेशातही पसरली आहे. त्यामुळे या मंदिरात विदेशी पर्यटकही मोठ्या उत्साहाने येतात.
आज आपण या मंदिराविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
1. बाबा विश्वनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी 9वं ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराबद्दल असं म्हटलं जातं की, हे मंदिर स्वयं प्रकट झालं आहे. या मंदिराची कोणी निर्मिती केली नाही.
2. हे मंदिर 11 व्या दशकातील राजा विक्रमादित्य यांनी बांधलं होतं, असं म्हणतात. यानंतर अनेक वेळा मुगलांकडून या मंदिराची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पुन्हा या मंदिराची निर्मिती करण्यात आली.
3. सध्या या मंदिराची जी रचना आहे ती इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बनवली आहे. नुकताच या मंदिराचं विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे.
4. असं मानले जातं की, बाबा विश्वनाथांच्या या मंदिराचं रक्षण स्वत: काल भैरव करायचे. त्यांना काशी कोतवाल असं म्हटलं गेलं आहे. म्हणून त्यांच्या दर्शनाशिवाय ज्योतिर्लिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे बाबा विश्वनाथांच्या दर्शनापूर्वी भाविक काल भैरवाचं दर्शन घेतात.
5. असं म्हणतात जिथे शिवचा वास आहे तिथे कोणत्या ना कोणत्या रुपात शिवच्या शक्तीचा वास असतो. खूप कमी लोकांना माहिती आहे की काशीमध्ये केवळ ज्योतिर्लिंगच नाही तर शक्तीपीठ पण आहे. देशातील 51 शक्तीपीठांपैकी एक माँ विशालाक्षीचे मंदिर बाबा विश्वनाथाच्या मंदिराजवळ आहे. असं म्हणतात या मंदिराजवळ माता सतीचे अंश पडले आहेत.
6. काशी विश्वनाथ मंदिराच्या घुमटामध्ये श्रीयंत्राची स्थापना आहे. त्यामुळे असं मानलं जातं की, बाबा विश्वनाथांच्या चरणी प्रार्थना केली तर भगवान शिव भक्तांची इच्छा लवकरच पूर्ण करतात.
7. जर शिवभक्ताने बाबा विश्वनाथांच्या ज्योतिर्लिंगाला स्पर्श केला आणि पूजा केली तर त्याला राजसूय यज्ञाचं फळ मिळतं, असं मानलं जातं.
8. काशी हे एकमेव स्थान आहे जिथे गंगा ही उत्तर वाहिनी आहे. इथे गंगेचे अनेक घाट आहेत. काशीमधील माता गंगा आणि पवित्र घाटाची आरती जगभरात प्रसिद्ध आहे. या आरतीसाठी लोकं दररोज मोठ्या संख्येने जातात.
9. महादेवाच्या काशीत जर आपण प्राण सोडलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतं असं मानलं जातं. काशीत राहणाऱ्या शिवभक्ताला भगवान शिव स्वत: तारक मंत्र प्रदान करुन त्यांना मुक्ति देतात, असा शिवभक्तांचा विश्वास आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त आयुष्यातील शेवटचे दिवस बाबा विश्वनाथच्या या नगरीत राहिला येतात.
10. पवित्र आणि प्राचीन काशी नगरीबद्दल अजून एक मान्यता आहे की, या नगरीतील कणाकणात शिवचा वास आहे. शिवभक्तांमध्ये अशी मान्यता आहे की या नगरीत 30 कोटी देवीदेवतांचा वास आहे.