हिजाब न घालता शिकवण्यास शिक्षिकेचा नकार, उचललं हे मोठं पाऊल

एका महाविद्यालयातील इंग्लिश प्राध्यापिकेला हिजाबबंदी करण्यात आली, त्यानंतर या शिक्षिकेने मोठा निर्णय घेतला  

Updated: Feb 18, 2022, 12:44 PM IST
हिजाब न घालता शिकवण्यास शिक्षिकेचा नकार, उचललं हे मोठं पाऊल title=

बंगळुरु : कर्नाटकातील हिजाबचा वाद (Karnataka Hijab Controversy) थांबण्याचं नाव घेत नाहीए. आता एका प्राध्यापिकेने (English Lecturer) हिजाब न घालता शिवकवण्यास नकार देत आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकमधल्या एका महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिकेला हिजाब न घालता शिकवण्यास सांगण्यात आलं. पण यामुळे आपला स्वाभिमान दुखावल्याचं कारण देत या प्राध्यापिकेने पदाचा राजीनामा दिला.

धार्मिक पोशाखांना परवानगी नाही
हिजाबचा वाद सध्या उच्च न्यायालयात असून, शाळांमध्ये हिजाबसह (Hijab) कोणत्याही प्रकारचे धार्मिक पोशाख किंवा कपडे परिधान करण्यास परवानगी नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. हिजाबचा वाद उडुपीपासून सुरू झाला होता. तेव्हापासून देशाच्या विविध भागांत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोधात निदर्शने होत आहेत. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा मुद्दा अधिकच तापला आहे.

अतिरिक्त सुरक्षा दल तैनात
उडुपीमधील ज्या महात्मा गांधी मेमोरिअल कॉलेजमधून या संपूर्ण वाद सुरू झाला, ते गेल्या १० दिवसांपासून बंद होतं. आता ते परीक्षेसाठी खुले करण्यात आलं आहे. सध्या कॉलेजमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उडुपीमधील परिस्थिती सामान्य असून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

मुख्यमंत्री बोम्मई यांनी काय म्हटलं
हिजाब वादावरुन कर्नाटक विधानसभेतही गदारोळ सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचं आपलं सरकार पालन करेल, असं स्पष्ट केलं आहे. गुरूवारी काँग्रेस आमदारांनी कर्नाटक विधानसभेत रात्रभर निदर्शने केली. भगव्या ध्वजाच्या वक्तव्यावरून त्यांनी राज्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.