कुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावाला तयार, बंडखोरांना हवीय ४ आठवड्यांची मुदत

संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामी हे प्रथम विश्वासदर्शक ठरावावर बोलतील

Updated: Jul 23, 2019, 10:17 AM IST
कुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावाला तयार, बंडखोरांना हवीय ४ आठवड्यांची मुदत  title=

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेलं राजकीय नाट्याचा आज सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरं जायला अखेर तयार झालंय. आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामी हे प्रथम विश्वासदर्शक ठरावावर बोलतील आणि त्यानंतर सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता पण त्यानंतर चर्चेचं कारण देत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार टाळाटाळ करत होते पण विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी 'कर्नाटकची जनता आपल्या सर्व व्यवहाराकडे पाहतेय त्यामुळे विश्वासदर्शक ठराव किती वाजता मांडणार याबद्दल स्पष्ट सांगा', अशी सूचना सोमवारी रात्री केली. 

त्यावेळी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज संध्याकाळी सहाच्या आत मुख्यमंत्री कुमारस्वामी हे विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जातील अस सांगितलं. पण विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढू धोरणाबाबत भाजपा नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ११ आमदारांना पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार नोटीस बजावली असून आज सकाळी ११ वाजेपर्यंत अध्यक्षांच्या दालनात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांचा नवा पवित्रा पाहायला मिळतोय. विधानसभा अध्यक्षकांपुढे हजर होण्यास ४ आठवड्याची मुदत मागितलीय. तूर्त सगळे आमदार पवईतच आहेत. आज त्यांना अकरा वाजेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत.