बंगळुरू: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. या सगळ्यात मतदार राजाची मर्जी सांभाळण्यासाठी राजकीय नेत्यांकडून कोणतीही कसूर सोडली जात नाहीये. राजकीय सभा, प्रसारमाध्यमे , स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद अशा प्रत्येक स्तरावरून नेत्यांकडून स्वत:ची भूमिका मांडायचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भन्नाट युक्त्या आणि मार्गांचा वापर सुरु आहे. कर्नाटकमध्ये बुधवारी याचा तंतोतंत प्रत्यय आला. एरवी पाच वर्षांच्या काळात राजकारणी जनतेमध्ये फारसे मिसळत नाहीत. लोकांना आपल्या तालावर नाचवतात. मात्र, बंगळुरूच्या होसकोटे येथे बुधवारी एक मजेशीर चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी काँग्रेसकडून प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एम.टी.बी. नागराज याठिकाणी प्रचाराला आले होते. यावेळी प्रचारसभेत कार्यकर्ते गाण्याच्या तालावर नाचत होते. काही कार्यकर्त्यांनी एम.टी.बी. नागराज यांनाही नाचण्याचा आग्रह धरला. मग एम.टी.बी. नागराज यांनीही नागीन डान्स करत उपस्थितांना आश्चर्यचकित केले. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH Karnataka Housing Minister MTB Nagraj dances with a group of people while campaigning in Hoskote. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/InQmOuLOis
— ANI (@ANI) April 10, 2019
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल. २३ मे रोजी याचा निकाल जाहीर होईल.