नवी दिल्ली - ज्यांच्या नियुक्तीवरून वकील संघटनांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धरणे आंदोलन केले होते ते न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातील एक क्रमाकांच्या कक्षामध्ये शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या सध्या ३१ आहे. पण यापैकी काही पदे अद्याप रिक्त आहेत. आता न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या २८ झाली आहे.
न्या. दिनेश माहेश्वरी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तर न्या. संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. ए के सिक्री, न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन वी. रमण आणि न्या. अरुण मिश्रा या पाच सदस्यांच्या कॉलेजियमने १० जानेवारी रोजी न्या. माहेश्वरी आणि न्या. खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्याची शिफारस केली होती.
कॉलेजियमने १२ डिसेंबर २०१८ रोजी पदोन्नतीसाठी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नंद्रजोग आणि न्या. राजेंद्र मेनन यांच्या नावांचा विचार केला होता. पण त्यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. ३० डिसेंबर २०१८ रोजी कॉलेजियमचे एक सदस्य न्या. मदन लोकूर निवृ्त्त झाले. त्यानंतर न्या. अरुण मिश्रा यांनी त्यांची जागा घेतली. १० जानेवारी रोजी नवीन कॉलेजियमने आधीचा प्रस्ताव रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाविरोधात भारतीय बार कौन्सिलने धरणे आंदोलन केले होते.