Karnataka elections : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकांची (karnataka assembly election 2023) रणधुमाळी उडाली आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP), काँग्रेस (Congress) आणि जनता दल (सेक्युलर) (JD(S)) यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. राजकारण्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं दिली जात आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यापासून ते लग्नापर्यंत विविध आश्वासन मतदारांना दिली जात आहे. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy यांनी सोमवारी मतदारांना एक अनोखे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलींना आपला पक्ष दोन लाख देणार आहे, असे कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. कोलार येथील पंचरत्न रॅलीला संबोधित करताना कुमारस्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे.
"माझ्याकडे एक तक्रार आली आहे की मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न (marriage of farmers) करण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुलींना दोन लाख रुपये द्यायला हवेत. शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या तरुणांसाठी हा एक चांगला निर्णय ठरेल," असे एचडी कुमारस्वामी म्हणाले. आमच्या मुलांच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी हा एक कार्यक्रम असेल कुमारस्वामी म्हणाले.
माजी पंतप्रधान देवेगौडा प्रचारासाठी मैदानात
जनता दल (एस) प्रमुख एचडी देवेगौडा हे देखील निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा एक व्हिडिओ संदेश पक्षाने जारी केला आहे. "मी 10 एप्रिलनंतर राज्याचा दौरा करणार आहे. मी म्हैसूर प्रदेशात (मंड्या, हसन, कोलार, चिक्कमगालुरू, चिक्कबल्लापूर, रामनगरा आणि तुमकूर) भेट देणार आहे. हा आमच्या पक्षाचा बालेकिल्ला आहे," असे देवगौडा यामध्य म्हणताना दिसत आहेत.
कुमारस्वामी यांचा अमूलला विरोध
कर्नाटकात सध्या अमूल विरुद्ध नंदिनी असा दुधाचा वाद पेटला आहे. त्यात आता एचडी कुमारस्वामी यांनी उडी घेतली आहे. एचडी कुमारस्वामी यांनी शनिवारी कर्नाटकातील जनतेला राज्यात अमूल दूध विकण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. "केंद्र सरकारच्या पाठिंब्याने अमूलला मागच्या दाराने कर्नाटकात ढकलले जात आहे. अमूल कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) आणि शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे. कन्नड लोकांनी अमूलच्या विरोधात बंड केले पाहिजे," असे कुमारस्वामी म्हणाले.
कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल आणि 13 मे रोजी निकाल लागणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली. कर्नाटक विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 224 सदस्यांच्या विधानसभेत सध्या भाजपचे 119, काँग्रेसचे 75 आणि जनता दल (एस) 28 सदस्य आहेत. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने 124 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे कर्नाटकातील 5.21 कोटी मतदार 10 मे रोजी 224 विधानसभा जागांसाठी मतदान करणार आहेत.