भोपाळ : माजी केंद्रीयमंत्री आणि मध्य प्रदेशातले काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सिंधिया यांच्या १९ समर्थक आमदारांनीही विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे पाठवले आहेत. यात सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातल्या कमलनाथ सरकार कोसळ्यात जमा आहे.
ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे आपला राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे राजीनामा पत्रावर कालची तारीख आहे. त्यामुळे ज्योतिरादित्यांनी कालच आपला राजीनामा तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळीच सिंधियांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सत्तेत भागिदारीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे.
ज्योतिरादित्य यांना राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रात मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी नाकारल्य़ामुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये समर्थकांना डावलल्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया नाराज होते. दरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधियांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर काँग्रेस आमदारांनी आणि काही मंत्र्यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला. त्यांनीही पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ सरकार आता अल्पमतात आले आहे. काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांचा यात समावेश आहे. त्यांनी एकत्रित आपला राजीनामा राजभवनात पाठवून दिला आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे.
राजीनामा दिलेल्या आमदरांमध्ये प्रदुम्न सिंह तोमर, रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा संत्राव (भांडेर), जसपाल सिंह जज्जी (अशोक नगर), इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, सुरेश धाकड (शिवपुरी), महेंद्र सिंह सिसोदिया, ओपी एस भदौरिया, रणवीर जाटव, गिरज दंडोतिया, जसवंत जाटव, गोविंद राजपूत, हरदीप डंग, मुन्ना लाल गोयल, ब्रिजेंद्र यादव यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे आणखी एक आमदार बिसाहु लाल सिंह यांनीही राजीनामा दिला आहे. बिसाहू लाल सिंह यांनी काँग्रेस आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. आपली काँग्रेस पक्षा उपेक्षा झाल्याचे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, काँग्रेसचे आणखी सात आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मिळत आहे. हे सातही आमदार आज रात्रीपर्यंत राजीनामा देण्याची शक्यता आहे.