'...म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस नेत्यांना भेटले नाहीत'

स्वाईन फ्लू झाल्यामुळे ते कोणाला भेटू शकणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले.

Updated: Mar 10, 2020, 11:31 AM IST
'...म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस नेत्यांना भेटले नाहीत' title=

भोपाळ: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नाराजीनाट्यामुळे सध्या मध्य प्रदेशातील राजकारण क्षणाक्षणाला रंग पालटत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे सोमवारपासून दिल्लीत आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसश्रेष्ठी आणि इतर नेत्यांची भेट न घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंधिया यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही ज्योतिरादित्य सिंधिया यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वाईन फ्लू झाल्यामुळे ते कोणाला भेटू शकणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळेच आम्ही अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. मात्र, काँग्रेस पक्षाचे सच्चे कार्यकर्ते पक्षातच राहतील, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता सिंधिया काँग्रेसश्रेष्ठींशी संवाद साधून समेट करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

ज्योतिरादित्य सिंधियांची मोदींसोबत चर्चा; काँग्रेसश्रेष्ठींसाठी नॉट रिचेबल?

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही आता समोर आली आहे. बडोद्याच्या राजपरिवाराच्या पुढाकारने ही चर्चा झाली. तसेच गेल्या काही दिवसांपासून सिंधिया आणि शिवराज चौहान यांच्यात अनेक भेटीगाठी झाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. 

काँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?

यापूर्वी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सिंधिया यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया यांची आज जयंती आहे. त्यामुळे आज ज्योतिरादित्य सिंधिया आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.