Jodhpur Self Killing Case : बंगळुरुतील (Bengaluru Stul Subhash) घटना संपूर्ण देशाला हादरा देऊन गेलेली असतानाच आता राजस्थानातील जोधपूर इथंही अशाच एका घटनेनं खळबळ माजवली आहे. जोधपूरमध्ये 35 वर्षीय होमियोपॅथिक डॉक्टर अजय कुमार यांनी 11 डिसेंबर रोजी टोकाचं पाऊल उचलत स्वत:चच आयुष्य संपवलं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिथं त्यांना एक पत्र सापडलं.
घटनास्थळी अजयनं लिहिलेल्या या पत्रातून त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे. पत्रामध्ये पत्नीचा अर्थात सुमन या नावाचा उल्लेख असल्यामुळं पोलिसही हादरले. पोलिसांच्या माहितीनुसार डॉक्टर अजय कुमार यांनी जोधपूरमधील किर्तीनगर इथं स्वत:च्या क्लिनिकमध्येच गळफास लावून घेतला. मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, अनेक प्रयत्नांनंतरही त्याच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळं त्यातील एक सहकारी थेट क्लिनिकवर पोहोचला आणि तिथं त्यानं अजय यांना बेशुद्धावस्थेत पाहिलं.
घटनास्थळावरील दृश्य पाहताच सहकाऱ्यानं तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, अजय यांनी लिहिलेल्या पत्रातून पत्नीवर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालंय जिथं त्यांनी पत्नीनं आपला मानसिक छळ केल्याचा गंभीर मुद्दा उजेडात आणला. या पत्रातून आपली नाराजी आणि संघर्षाविषयी मन मोकळं करत अजय यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांच्या हाती मिळालेल्या माहितीनुसार अजय कुमार मागील तीन वर्षांपासून आयुर्वेदिक विद्यालयात सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत असून, ते जोधपूरमध्येच वास्तव्यास होते.
डॉक्टर अजय आणि सुमन सात वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते, त्यांना चार वर्षांचा मुलगाही आहे. सध्या मात्र सुमन आणि अजयचा मुलगा तिच्याचसोबत जयपूरमध्ये वास्तव्यास असून कुटुंबाच्या आरोपांनुसार सुमननं बऱ्याच काळापासून अजयचं मानसिक ख्चचीकरण केलं असून, त्यामुळं त्याला प्रचंड तणावाचा सामना करावा लागला होता, ज्यामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
बंगळुरूतील अतुल सुभाष यांनी स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेत न्ययाव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केलेला असताना जोधपूरमधील या घटनेमुळं पुन्हा एकदा वैवाहिक जीवनातील ताण आणि पुरुषांच्या मानसिक आरोग्याचाही मुद्दा ऐरणीवर आल्याचं स्पष्ट होत आहे.
(विचलित विचारधारणेतून कोणीही व्यक्ती आयुष्य संपवण्याच्या वार्ता करत असल्यास केंद्र सरकारच्या 18002333330 या जीवनसाथी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. इथं संपर्क साधणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जात असून, पीडितांना आवश्यक ती सर्व मदत आणि सल्ला दिला जातो. )